काँग्रेसचे चिंतन शिबिर : अपयशाची चिंता सोडून सारे काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress chintan shibir Mallikarjun Kharge congress party successive defeats Udaipur

काँग्रेसचे चिंतन शिबिर : अपयशाची चिंता सोडून सारे काही

उदयपूर : ‘काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये पक्षाच्या सततच्या पराभवांवर आत्मपरीक्षण करण्याऐवजी इतर गोष्टींवरच बोलले जात आहे.’ अशी स्पष्ट नाराजी व्यक्त झाल्याचे समजते. तात्त्विक बोलण्याऐवजी कार्यकर्त्यांना विजयाचा नेमका काय संदेश देणार? असा रोकडा सवाल पुढे आला असून ‘आघाडी’बद्दलचा संभ्रम संपवा अशी आक्रमक मागणीही अनेक नेत्यांकडून झाल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिंतन शिबिरात वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील गट राजकीय विषयावर दोन दिवसांपासून चर्चा करतो आहे. या चर्चेमध्ये आघाडीच्या राजकारणावर राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील नेत्यांमधील मतभेद पुढे आल्याचे कळते.

या गटामध्ये चर्चेसाठी राज्यघटनेवर होणारा हल्ला, लोकशाहीचा होणारा संकोच, धार्मिक, भाषिक वैविध्य जपणे, वाढता जातीयवाद आणि संघाची भूमिका, केंद्र- राज्य संबंध, संघराज्य व्यवस्थेवरील आघात हे मुद्दे मांडण्यात आले होते. काँग्रेसच्या काही नेत्यांनी यावरून उघडपणे नाराजी व्यक्त केली. या विषयांवर कोणतीही वैचारिक मतभिन्नता नसताना त्यावर काथ्याकूट करण्याऐवजी आगामी निवडणुकांमध्ये विजयासाठी काँग्रेसचा नेमका कोणता संदेश चिंतन शिबिरातून दिला जावा? हा मुद्दा काहीजणांकडून उपस्थित करण्यात आला. मात्र, नेत्यांनी विषयांची मर्यादा सोडू नये असा आग्रह मल्लिकार्जुन खर्गे यांनी धरल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याआधी जवळपास १२ राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यात काँग्रेस पक्ष जिंकणार कसा? हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे या नेत्यांचे म्हणणे होते. यामध्ये महाराष्ट्राचे माजी प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. आघाडी करायची की ‘एकला चलो रे’ भूमिका घ्यायची यावरून पक्षामध्ये असलेले मतभेदही या चर्चेतून समोर आले आहेत.

यावरही चर्चा

‘‘भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने राज्यांमध्ये ताकदवान पक्षांना दुखावू नये. तमिळनाडू, महाराष्ट्राच्या धर्तीवर अन्य राज्यांमध्येही प्रसंगी दुय्यम भूमिका स्वीकारावी.’’ असे मत राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडले तर महाराष्ट्रामध्ये पुढील निवडणुकांसाठी आघाडी करायची की नाही याचे दिशानिर्देश नेतृत्वाने आधीच द्यावे, असे पृथ्वीराज चव्हाण यांचे सांगणे होते. काही नेत्यांनी काँग्रेसच्या दुय्यम भूमिकेला विरोध केला.पक्ष पूर्ण ताकदीने लढला नाही तर कार्यकर्त्यांना विश्वास वाटणार नाही असे त्यांचे म्हणणे होते. प्रदेश पातळीवरील नेत्यांनी आघाडीच्या निर्णय प्रक्रियेत स्वतःच्या वर्चस्वाचा आग्रह धरला. निवडणूक पूर्व आघाडी झाल्यास स्थानिक नेते आपापल्या पद्धतीने तडजोडी करतात, हे मुद्देही उपस्थित झाल्याचे समजते.

भाजपला मोकळे रान नको

गटचर्चेमध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हिंदू सण उत्सवांपासून काँग्रेसने अंतर राखून भाजपला मोकळे रान देऊ नये, असे मत मांडले. तर अन्य नेत्यांनी अल्पसंख्याक समाज काँग्रेसला समर्थ पर्याय मानत नसल्याचे सांगताना उत्तर प्रदेशात मुस्लिमांची मते काँग्रेसला मिळाली नसल्याकडे लक्ष वेधले. या गटचर्चेमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच प्रियांका गांधींनीही काही काळ हजेरी लावली मात्र तिघांनीही बोलण्याचे टाळले.

राज्यसभेच्या संधीमुळे असंतुष्ट शांत

या गटचर्चेमधील सहभागी एका वरिष्ठ नेत्याने ‘सकाळ’शी बोलताना नाराजीला वाट करून दिली. राज्यसभेची निवडणूक असल्यामुळे संधीच्या अपेक्षित असलेले बरेच अस्वस्थ नेते चिंतन शिबिरात शांत असल्याकडेही काहींनी लक्ष वेधले. चिंतन शिबिरामध्ये आत्मपरिक्षणाची चर्चा नाही करायची? हा आग्रह अनाकलनीय आहे. भाजपला रोखण्यासाठी सत्ता महत्त्वाची आहे. केवळ प्रस्ताव मंजूर करून भागणार नाही तर काँग्रेसला विजयाचा संदेश द्यावा लागेल, अशी टिप्पणीही या नेत्याने केली.

Web Title: Congress Chintan Shibir Mallikarjun Kharge Congress Party Successive Defeats Udaipur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top