
"काँग्रेसपुढची स्थिती अभूतपूर्व, त्यामुळे..."; सोनिया गांधींचा थेट इशारा
उदयपूर (राजस्थान) : ‘‘काँग्रेस संघटनेपुढील स्थिती अभूतपूर्व आहे. या असाधारण परिस्थितीचा मुकाबला असाधारण पद्धतीनेच करावा लागेल,’’ अशा टोकदार शब्दांत सोनिया गांधींनी संघटनेतील शस्त्रक्रियेचा थेट इशारा आज चिंतन शिबिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दिला. पक्षात कठोर सुधारणांची नितांत गरज असल्याची स्पष्ट कबुलीही त्यांनी दिली. तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूरच्या हॉटेल ताज अरावली परिसरामध्ये आजपासून सुरू झालेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प चिंतन शिबिराचे उद्घाटन करताना सोनिया गांधींनी पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी पक्षात आणि पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये व्यापक बदलांचे संकेत दिले. चिंतन शिबिरासाठी आलेल्या देशभरातून ४३० प्रतिनिधींशी सुरवातीला इंग्रजी आणि नंतर हिंदी अशा दोन्ही भाषांमधून संवाद साधताना सोनियांनी काँग्रेसमधील त्रुटींवर सूचक शब्दांत तर मोदी सरकारवर उघड शरसंधान केले.
या शिबिराच्या निमित्ताने सोनिया गांधींनी असंतुष्ट मानल्या जाणाऱ्या ‘जी-२३’ गटाच्या गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांना शेजारी बसवून तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींना बसवून सर्वजण एकत्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही असंतुष्ट नेते यामुळे सुखावल्याचेही दिसून आले. अशाच प्रकारे मने सांधण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर नाराजीमुळे पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर राहणारे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी हेही चिंतन शिबिरात सहभागी झाल्याचे दिसले. सोनिया गांधींनी चिंतन शिबिरासाठी त्यांना विशेष निमंत्रण पाठवून बोलावून घेतल्याचे समजते.
पक्षाच्या पातळीवर आणि व्यक्तिगत पातळीवरही चिंतनाची गरज व्यक्त करताना सोनिया गांधींनी महत्त्वाकांक्षी नेत्यांना सबुरीचा सल्लाही दिला. ‘‘संघटनेमध्ये बदलासाठी वेळेची गरज असून आपल्या कार्यपद्धतीमध्येही बदल करावा लागेल. त्याचप्रमाणे, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा संघटनात्मक गरजेच्या मर्यादेतच असाव्यात,’’ अशा कानपिचक्या सोनिया गांधींनी दिल्या. ‘‘पक्षाने आपल्याला बरेच काही दिले आता पक्षाच्या कर्जातून उतराई होण्याची वेळ आली आहे. संघटना जिवंत राहण्यासाठी परिवर्तनाची आवश्यकता आहे. आपल्याला कठोर सुधारणांची नितांत गरज आहे. हा सर्वांत मूलभूत मुद्दा आहे,’’ असे सांगत संघटनात्मक बदलांचा इशारा त्यांनी दिला.
अल्पसंख्याकांवर अत्याचार
सत्ताधारी भाजपवर हल्ला चढविताना सोनिया गांधी म्हणाल्या, की भाजपने देशातील जनतेला भयाच्या वातावरणात राहण्यासाठी भाग पाडले आहे. देशाला भाजप, संघ आणि त्यांच्या संलग्न संस्थांच्या धोरणांमुळे ज्या आव्हानांचा मुकाबला करावा लागतो, त्यावर चर्चेची संधी चिंतन शिबिराने दिल्याचे सांगताना पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मॅक्झिमम गव्हर्नन्स मिनिमम गव्हर्न्मेंट (कमाल प्रशासन आणि किमान सरकार) या म्हणण्याचा अर्थ अल्पसंख्याकांवर क्रूर अत्याचार आहे, असा प्रहारही सोनिया गांधींनी यावेळी केला. तर, चिंतन शिबिराचे यजमान असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोदी सरकारवर तपास यंत्रणांच्या गैरवापराचा आणि धार्मिक ध्रुवीकरणातून समाजात तेढ वाढविली जात असल्याचा हल्लाबोल केला.
नेत्यांनो मोबाईल दूर ठेवा!
काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिरात सोनिया गांधींच्या उद्घाटनपर भाषणानंतर काँग्रेस पक्षातील त्रुटी आणि संभाव्य उपायांवर वेगवेगळ्या गटांच्या अंतर्गत बैठकींमध्ये राजकीय, संघटना, शेतकरी, आर्थिक स्थिती, युवक आणि सामाजिक न्याय या गटांवर मंथनाला सुरवात झाली. मात्र हे मंथन गोपनीय राहावे यासाठी गटचर्चेत सहभागी होणाऱ्या सर्व बड्या नेत्यांना सोबत मोबाईल बाळगण्यासही मज्जाव करण्यात आला. तर, त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही चिंतन शिबिर संकुलामध्ये थांबता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. सोबत, पक्षाच्या कर्मचाऱ्यांनाही बाहेर जाण्याचे आदेश दिले. तर, माध्यम प्रतिनिधींनाही शिबिर स्थळाशेजारील एका मंडपातूनच वार्तांकन करण्यास सांगण्यात आले होते.
Web Title: Congress Chintan Shibir Situation Before Congress Is Unprecedented Need For Improvement Sonia Gandhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..