
काँग्रेस चिंतन शिबिर : '२०२४ साठी आघाडीला पाठिंबा, पण...', खर्गेंनी मांडली भूमिका
उदयपूर : काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी शुक्रवारी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी आघाडी गरजेची असल्याचं म्हटलं. पण, त्यापूर्वी आपल्याला आपल्या पक्षात काही सुधारणा कराव्या लागतील. आपला पक्ष मजबूत करावा लागेल, असं त्यांनी म्हटलं. आपल्याकडे पैसे नसतील तर कोणी आपल्या कंपनीत गुंतवणूक का करेल? असं उदाहरण देखील त्यांनी यावेळी दिलं.
हेही वाचा: काँग्रेस चिंतन शिबिर : २०२४ मध्ये सत्ता कशी मिळवायची? सोनिया गांधी करणार संबोधित
संभाव्य मित्र पक्षांनी वैचारिकदृष्ट्या काँग्रेससोबत एकरूप व्हायला पाहिजे. त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांवर दृढ विश्वास ठेवायला पाहिजे. आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे, असंही खरगे म्हणाले. उदयपूर येथे होत असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते.
काँग्रेससमोर पाचपट राजकीय आव्हाने आहेत. प्रथम काँग्रेसने तरुणांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या समृद्ध वारशांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. दुसरं म्हणजे, कार्यकर्ते आणि समर्थकांना आश्वस्त करण्यासाठी पक्षाची विचारधार पुन्हा परिभाषित करण्याची गरज आहे. तिसरं म्हणजे, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, संघराज्य संरचना, समाजातील सर्वात गरीब आणि अत्याचारित लोकांचे स्वातंत्र्य सुनिश्चित करून, संविधानाप्रती आपली बांधिलकी निश्चित करावी लागेल. चौथे, आपल्याला भारतीय जीवनपद्धती आणि भारतीय असण्यावर पुन्हा एकदा हक्क सांगावा लागेल. पाचवे, आपल्याला आपले राजकारण नव्याने सुरू करण्याची गरज आहे, असं खर्गे म्हणाले.
भाजप आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यांवर देखील खर्गेंनी टीका केली आहे. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी न झालेले लोक आम्हाला राष्ट्रवाद शिकवू पाहत आहेत. तुम्ही खरे देशभक्त असाल तर भारत छोडो आंदोलनादरम्यान तुम्ही कुठे होता? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. १९६५ मध्ये पाकिस्तानसोबतच्या युद्धादरम्यान लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वापासून ते १९७१ मध्ये बांगलादेशच्या मुक्तीमध्ये इंदिरा गांधींच्या भूमिकेपर्यंत राजीव गांधींनी चीनसोबतच्या सीमाप्रश्नावर ठामपणे हाताळलेली भूमिका, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर काँग्रेसचा उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड आहे, असंही खर्गे म्हणाले.
Web Title: Congress Chintan Shivir Mallikarjun Kharge Backs Allaince For 2024 Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..