काँग्रेस अध्यक्षपदासाठी शिंदे?; कार्यकारिणीची आज बैठक 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 22 January 2021

अध्यक्षपदासाठी सहमतीचा उमेदवार म्हणून महाराष्ट्रातील नेते सुशील कुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचेही कळते. प्रियांका गांधींकडे कार्यकारी अध्यक्षपद सोपविण्याचाही विचार पक्षातून पुढे आल्याचे समजते. 

नवी दिल्ली - संघटनात्मक निवडणुकीबाबत काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज (ता. २२) निर्णायक बैठक होणार आहे. नाराज ‘जी-२३’ गटाच्या आग्रही मागणीनंतरही पक्ष नेतृत्व निवडणुकीसाठी फारसे अनुकूल नसल्याचे समजते. मात्र, नेतृत्वाचा मुद्दा शांत करण्यासाठी जुन्या जाणत्या ज्येष्ठ व्यक्तीकडे अध्यक्षपद आणि गांधी कुटुंबातील किंवा कुटुंबाच्या विश्वासू व्यक्तीकडे कार्यकारी अध्यक्षपद दिले जाऊ शकते. अध्यक्षपदासाठी सहमतीचा उमेदवार म्हणून महाराष्ट्रातील नेते सुशील कुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचेही कळते. तर, प्रियांका गांधींकडे कार्यकारी अध्यक्षपद सोपविण्याचाही विचार पक्षातून पुढे आल्याचे समजते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेसमध्ये गांधी कुटुंब हा सर्वांना जोडणारा घटक असल्यामुळे राहुल गांधींनी पुन्हा अध्यक्ष व्हावे किंवा ते तयार होईपर्यंत सोनिया गांधींनी अध्यक्षपदी राहावे, असा एका गटाचा आग्रह आहे. मात्र, राहुल गांधींचा स्पष्ट नकार आणि सोनिया गांधींचे प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पाहता अध्यक्षपदासाठी अन्य पर्यायांची चाचपणी सुरू आहे. संघटनात्मक निवडणुकीनंतर अध्यक्षपदाचा कार्यकाळ दोन वर्षाचा (डिसेंबर २०२२ पर्यंत) राहणार असल्याने या मर्यादित काळासाठी गांधी कुटुंबाच्या विश्वासू व्यक्तीला अध्यक्ष बनविणे हा एक पर्याय आहे. मात्र, नाराज नेत्यांचा ‘जी-२३’ गट यासाठी तयार होईल याची खात्री नाही. त्यामुळे सर्वांच्या सहमतीने ज्येष्ठ व्यक्तीकडे अध्यक्षपद देणे आणि पक्षाचा कारभार चालविण्यासाठी कार्यकारी अध्यक्षपद तयार करणे व गांधी कुटुंबीयांच्या विश्वासू व्यक्तीकडे ते दिले जावे, या पर्यायाचीही चाचपणी सुरू असल्याचे कळते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राहुल यांचा नकार कायम 
गांधी कुटुंबाच्या विश्वासातील व्यक्तीकडे कार्यकारी अध्यक्षपद सोपवून अप्रत्यक्षपणे पक्षाची सूत्रे गांधी कुटुंबाकडेच ठेवण्याची सूचना निष्ठावंतांकडून आल्याचे समजते. अध्यक्षपदासाठी राहुल गांधींनी स्वतःच्या आणि प्रियांका गांधींच्या नावाचा इन्कार केला असला तरी, कार्यकारी अध्यक्षपदाबद्दल त्यांनी काहीही भूमिका जाहीर केलेली नाही. शिवाय, नाराज नेत्यांशी संवादाची सुरुवात करण्यात प्रियांका गांधींनी घेतलेला पुढाकार पाहता या कार्यकारी अध्यक्षपदासाठी प्रियांका यांचे नावही पुढे येऊ शकते. तर, सुशील कुमार शिंदे यांचे नाव संभाव्य अध्यक्षपदासाठी पुढे येऊ शकते, असे कळते. उत्तर प्रदेशचे प्रभारी सरचिटणीस या नात्याने गांधी कुटुंबाच्या विश्वासू वर्तुळात समाविष्ट झालेले सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे यूपीएच्या सत्ताकाळात केंद्रीय गृहमंत्रिपद, लोकसभेचे सभागृह नेतेपदही सोपविण्यात आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress committee meeting jan 22 with party polls sushilkumar shinde Maharashtra