चीनबद्दल मोदी मौन कधी सोडणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi
चीनबद्दल मोदी मौन कधी सोडणार?

चीनबद्दल मोदी मौन कधी सोडणार?

नवी दिल्ली : चीनने भूतानच्या हद्दीत चार गाव वसविले असून ही गावे डोकलाम भागापासून अवघ्या काही किलोमीटरवर आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या दिव्य मौनात आहेत, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. तसेच, चीनबद्दल मोदी मौन कधी सोडणार आणि प्रत्युत्तर कधी देणार, असा सवालही कॉंग्रेसने केला आहे.

काँगग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी भूतान हद्दीतील चिनी गावावरून केंद्र सरकारला लक्ष्य करताना राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड चालविल्याचा आरोप केला. चीनच्या सीमाभागातील हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या दाव्यानुसार आणि प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांनुसार चीनने भूतानच्या हद्दीत चार गावे वसविली असून ही गावे भारताच्या ईशान्य भाग आणि उर्वरित भागाला जोडणाऱ्या चिकन नेक या संवेदनशील क्षेत्रासाठी महत्त्वाच्या डोकलामपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. ही चार गावे मे २०२० ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत वसली आहेत, असा दावा गौरव वल्लभ यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनबद्दल दिव्य मौनात आहेत. या चिनी आक्रमकतेबद्दल मोदी गप्प का आहे, चीनबद्दल विस्तारवादी शक्ती यासारख्या पर्यायवाचक शब्दांचा आधार घेऊन बोलण्याऐवजी थेट प्रत्युत्तर कधी देणार, असा सवालही गौरव वल्लभ यांनी केला. अभिनेत्री कंगना रानावतवर जोरदार टीकास्त्र सोडताना गौरव वल्लभ यांनी कंगनाचा उल्लेख अज्ञानी सरकारी कलावंत असा केला. असे लोक महात्मा गांधींचा अपमान करतात आणि सरकार काहीही बोलत नाही.

वल्लभ यांनी, हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांच्यातील फरक म्हणजे महात्मा गांधींनी आचरण केले तो हिंदू धर्म तर नथुराम गोडसेने आचरण केले ते हिंदुत्व, अशी व्याख्याही केली. तसेच कंगना रानावतचे पुरस्कार परत घेऊन तिच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही केली.

loading image
go to top