ही तर 'जुमला किंग'ची 'इव्हेंटबाजी'! : मेगा भरतीवर कॉंग्रेसचे टीकास्त्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Central Govt Mega job recruitment drive

ही तर 'जुमला किंग'ची 'इव्हेंटबाजी'! : मेगा भरतीवर कॉंग्रेसचे टीकास्त्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरू केलेल्या केंद्र सरकारची मेगा भरती मोहीम म्हणजे 'जुमला किंग'ची 'इव्हेंटबाजी' अहे असा हल्लाबोल करतानाच राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळालेले हे पहिले यश आहे असा दावा कॉंग्रेसने केला आहे. दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देण्याच्या श्वासनाचीही आठवण कॉंग्रेसने मोदी व त्यांच्या सरकारला करून दिली आहे.

देशातील तरुणांना दिलेले १६ कोटी नोकऱ्यांचे आश्वासन कधी पूर्ण करणार, असा सवाल करून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी सत्तेवर आल्यास दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु गेल्या आठ वर्षांत ते अंशतःही पूर्ण झाले नाही.

सुरजेवाला यांनी लागोपाठ ट्विट करून सांगितले की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचे पहिले मोठे यश आहे. देशातील विक्रमी बेरोजगारी पहाता ७० हजार नोकऱ्या म्हणजे उंटाच्या तोंडात जिऱयाचा दाणा असल्यासारख्या आहेत. पण काही का असेना, भारत जोडो यात्रेच्या प्रतिसादानंतर दिल्लीच्या राजाचे ‘कान' एकदाचे उघडले आहेत !

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत सुरजेवाला यांनी म्हटले की "सध्या भारत जोडो यात्रा केवळ चार राज्यांत पोहोचली आणि अखेर 'जुमला राजा' ला बेरोजगारी ही देशाची सर्वात मोठी समस्या आहे, असे मानण्यास राहूल गांधी यांनी भाग पाडले.

पण ८ वर्षात १६ कोटी नोकऱ्यांच्या आश्वासनाचे काय झाले ? या नोकऱया कधी मिळणार हे तारीख-वार-महिना यासह जाहीर करा.

काँग्रेस मोदी यांना प्रश्न विचारतच राहील असे सांगताना सुरेजावाला म्हणतात कीकेवळ ७० हजार नियुक्तीपत्रे देऊन परिस्थिती बिलकूव बदलणार नाही. देशातील लाखो तरुणांना रोजगाराची गरज आहे आणि याचे उत्तर पंतप्रधानांना द्यावे लागेल. राहुल गांधी आणि काँग्रेस हे प्रश्न पंतप्रधानांसमोर सातत्याने मांडत राहतील.