मोदीजी, फोटो खोटं बोलत नाहीत; चिनी घुसखोरीवरुन काँग्रेसचा पुन्हा हल्लाबोल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 जुलै 2020

काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी चिनी घुसखोरीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारले आहेत. मोदीजी, छायाचित्र खोटं बोलत नाहीत, असं ते म्हणाले आहेत.

नवी दिल्ली- काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी चिनी घुसखोरीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारले आहेत. मोदीजी, छायाचित्र खोटं बोलत नाहीत, असं ते म्हणाले आहेत. लडाखमधील वास्तविक स्थिती काय आहे? पैंगोंग त्स्यो लेक भागात आणि फिंगर 4 मध्ये चिनी घुसखोरी झाल्याचं उपग्रह छायाचित्रांमधून स्पष्ट दिसत आहे.  भारताच्या भूभागावर चीनने अतिक्रमण करुन रडार, हॅलिपॅड आणि केलेले बांधकाम खोटं आहे का, असा सवाल सिब्बल यांनी केला आहे.

"मोदींना स्वतंत्रता दिनी घोषणा करता यावी म्हणून कोविड-19 लस निर्मितीसाठी...
चीनने गलवान खोऱ्यासह पेट्रोलिंग पॉईंट-14, जेथे भारताचे 20 जवान शहीद झाले होते तेथे अतिक्रमण केलं नाही का? चीनने भारतीय सीमेतील हॉट स्प्रिंग भाग ताब्यात घेतलाय का? डेपसांग प्लेंस वाई जंक्शनमध्ये ( प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून 18 किलीमीटर आतमध्ये) चीनने आपले सैन्य घुसवले नाही का? चीनच्या घुसखोरीमुळे डी.बी.ओ. हवाई अड्ड्याला धोका निर्माण झाला नाही का? असे एक ना अनेक प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केले आहेत.

माजी प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री आणि इंदिरा गांधी आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी फॉरवर्ड लोकेशनवर गेले होते. पंडीत जवाहरलाल नेहरु यांनीही 1962 मध्ये एनईएफए (NEFA)मध्ये  फॉरवर्ड लोकेशनवर जाऊन सैनिकांचे मनोबल वाढवले होते. मात्र, पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून दूर 230 किलोमीटरवर असलेल्या नीमूमध्येच थांबले. त्यांना  फॉरवर्ड लोकेशनवर जावावेसे वाटले नाही का?, असं म्हणत सिब्बल यांनी टीका केली आहे.

भारत विरुद्ध चीन: कागदावर ड्रॅगनची शक्ती मोठी, पण...
लडाखमधील स्थानिक समुपदेशकांनी, ज्यात भाजपच्या समुपदेशकांचाही समावेश होतो. त्यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये चीनने आपला भूभाग बळकावल्याचे निवेदन पाठवले नव्हते का? प्रधानमंत्री मोदींनी यावर काय कारवाई केली? जर मोदींनी वेळीच पाऊलं उचलली असती तर चीनकडून झालेली घुसखोरी आपण रोखू शकलो नसतो का? असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, भारत आणि चीनदरम्यान झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामुळे देशात चीनविरोधात संतापाची लाट आहे. या मुद्दावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. चीनने घुसखोरी केली नाही असं म्हणून मोदी देशवासीयांची दिशाभूल करत आहेत. मोदींनी जनतेला खरं सांगावं. उपग्रह छायाचित्रांमधून चीनने घुसखोरी केली आहे हे स्पष्ट होत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर दररोज ट्विट करत मोदींना लक्ष्य केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress criticize narendra modi on chines encrochment