esakal | अमित शहा राजीनामा द्या; काँग्रेस खासदारांची निदर्शने 
sakal

बोलून बातमी शोधा

parliament

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सरकारची कोंडी करण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. अन्य विरोधकांनीही आक्रमकतेचे स्पष्ट संकेत दिल्याने अधिवेशन काळात ‘ऑपरेशन अमित शहा’ हा मुद्दा विरोधक गाजवणार असल्याचे चिन्हे आहेत.

अमित शहा राजीनामा द्या; काँग्रेस खासदारांची निदर्शने 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून (ता. १) सुरू झाला असून, दिल्लीतील दंगल आणि गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसच्या खासदारांनी संसदेबाहेर निदर्शने केली. 

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सरकारची कोंडी करण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. अन्य विरोधकांनीही आक्रमकतेचे स्पष्ट संकेत दिल्याने अधिवेशन काळात ‘ऑपरेशन अमित शहा’ हा मुद्दा विरोधक गाजवणार असल्याचे चिन्हे आहेत. अमित शहांनी राजीनामा द्यावा, असे बोर्ड हातात धरून काँग्रेस खासदारांनी संसद आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेस खासदार राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, शशी थरूर यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते.  

अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात वित्त विधेयक, वेगवेगळ्या खात्यांच्या अनुदानविषयक मागण्यांना मंजुरी या अर्थसंकल्पी बाबी पूर्ण केल्या जाणार असल्या, तरी विरोधकांनी वादग्रस्त विषयांवरून सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा सुरू असताना दिल्लीत उसळलेला हिंसाचार, दिल्ली पोलिसांच्या अपयशामुळे चाळीसहून अधिक जणांना गमवावे लागलेले प्राण आणि कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे झालेले नुकसान, यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे.

भारताची प्रतिमा मलिन : चौधरी 
लोकसभेमध्ये काँंग्रेस गटनेते अधी रंजन चौधरी यांनी सांगितले की, काँग्रेसने स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली असून, दिल्लीतील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे जगभरात भारताची प्रतिमा मलिन झाली आहे. दिल्लीत हिंसाचार का आटोक्‍यात आला नाही आणि गृहमंत्री अमित शहा कोठे होते, याचा जाब दोन्ही सभागृहांमध्ये विचारला जाईल. विरोधी पक्ष या नात्याने सरकारला जाब विचारण्याची आपली जबाबदारी आहे. मागील आठवड्यात दिल्लीतील दंगलीवर कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक होऊन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच, काँग्रेसने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन यात हस्तक्षेप करण्याची तसेच सरकारला राजधर्म पाळण्यासाठी आदेश देण्याची मागणीही केली होती.