esakal | नेहरू-वडिलांचा फोटो शेअर करत सिंद्धूंची टीकाकारांना चपराक
sakal

बोलून बातमी शोधा

navjyot singh siddhu

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध सरशी झाल्यानंतर प्रदेशाध्यपद मिळताच माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया व्यक्त केली

नेहरू-वडिलांचा फोटो शेअर करत सिंद्धूंची टीकाकारांना चपराक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पतियाळा- पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध सरशी झाल्यानंतर प्रदेशाध्यपद मिळताच माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया व्यक्त केली. दिवंगत वडिलांचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबरील छायाचित्र त्यांनी ट्विट केले आणि आपल्याला बाहेरचा म्हणणाऱ्या टीकाकारांनाही चपराक दिली.काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी रविवारी रात्री सिद्धूंची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून पंजाबमधील अंतर्गत संघर्षावर तोडगा काढला. अमरिंदर यांचा सिद्धू यांच्या नियुक्तीला विरोध होता, तसेच सिद्धू यांनी माफी मागावी अशी अटही त्यांनी घातली होती. पक्षात फूट पडण्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर सिद्धू यांना झुकते माप देण्यात आले. त्यानंतर सिद्धू यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला. वडील आणि नेहरूंचे छायाचित्र ट्विट करीत त्यांनी लिहिले की, माझे वडील सरदार भगवंत सिंग काँग्रेस कार्यकर्ते होते. मुठभर लोकांचीच नव्हे तर सर्वांचीच भरभराट व्हावी तसेच त्यांना हक्क आणि स्वातंत्र्य मिळावे हा त्यांचा ध्यास होता. त्यामुळे त्यांनी आलिशान घराचा त्याग करून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. देशभक्तिपर कार्याबद्दल त्यांना मृत्युदंड ठोठावण्यात आला होता, पण राजाने त्यांची शिक्षा माफ केली. नंतर माझे वडील जिल्हा काँग्रेस समितीचे प्रमुख, दोन्ही सभागृहांत आमदार तसेच अॅडव्होकेट जनरल झाले. येथे महत्त्वाचा संदर्भ म्हणजे अमरिंदर यांचे पिता पतियाळा राजघराण्याचे शासक होते. अमरिंदर यांना या ट्विटद्वारे सिद्धू यांनी टोलाच लगावल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

सिद्धू यांच्या जोडीला चार कार्याध्यक्ष नेमण्यात आले. त्यात हिंदू आणि दलित प्रतिनिधींचा समावेश आहे. तशी मागणी अमरिंदर यांनी केली होती. ती पक्षश्रेष्ठींनी पूर्ण केली, पण यातील एकही नाव अमरिंदर यांनी निश्चीत केले नव्हते.

निर्णयाचे टायमिंग

रविवारी पंजाबमधील दहा आमदारांनी सिद्धू यांच्या नियुक्तीला विरोध दर्शविला होता. त्याचवेळी काँग्रेस खासदारांनी सोनिया यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. दुसरीकडे सोमवारी बैठक घेण्याची घोषणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी केली होती. त्याच रात्री सोनिया यांचा निर्णय सोशल मिडीयाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सिद्धू यांच्या जोडीला चार कार्याध्यक्ष नेमण्यात आले. संगत सिंग गिल्झीयन, सुखविंदर सिंग डॅनी, पवन गोयल आणि कुलजीत सिंग नाग्रा यांना संधी देण्यात आली.

loading image