
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी आज ईडीसमोर
नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज (ता. २१) ईडीसमोर चौकशीसाठी हजर होणार आहे. हा प्रकार राजकीय सुडाचा असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. तसेच सोनिया गांधींना पाठिंबा दर्शविण्यासाठी उद्या देशभरात निदर्शने करण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधींची नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीद्वारे मागील महिन्यात पाच दिवस चौकशी झाली होती. तर कोरोना संसर्ग आणि त्यानंतरच्या आजारपणामुळे सोनिया गांधी या चौकशीसाठी हजर होऊ शकल्या नव्हत्या. या कारणामुळे त्यांनी चौकशीची वेळ बदलण्याची विनंती ईडीकडे केली होती. त्यापार्श्वभूमीवर आता उद्या त्या ईडीसमोर जातील. यादरम्यान, सोनिया गांधींना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी कॉंग्रेसचे सर्व खासदार, नेते निदर्शने करणार आहेत.
पक्षाचे माध्यम विभागाचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी या मुद्द्यावर ट्विट करून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य करताना या निदर्शनांची घोषणा केली. मोदी- शहा जोडीकडून कॉंग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाविरुद्ध ज्या प्रकारे राजकीय सूड घेतला जात आहे त्याविरुद्ध कॉंग्रेस पक्षातर्फे सोनिया गांधींना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी उद्या देशभरात निदर्शने करण्यात येतील, असे जयराम रमेश यांनी यात म्हटले. तर, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी कॉंग्रेस नेत्यांनी बैठक घेऊन उद्याच्या शक्तीप्रदर्शनाची रणनीती ठरविली.
Web Title: Congress Leader Rahul Gandhi In The National Herald Case Sonia Gandhi Ed Enquiry Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..