राहुल गांधींना श्रीनगर विमानतळावर रोखले

वृत्तसंस्था
Saturday, 24 August 2019

राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आताच येथे येऊ नये, असे आवाहन राज्य प्रशासनाकडून करण्यात आले होते. तरीही हे सर्वजण आज सकाळी श्रीनगरला रवाना झाले होते. पण, त्यांना विमानतळावरच रोखण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेते काश्मीर दौऱ्यावर गेले असताना त्यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले.  आज (शनिवार) सकाळी दिल्लीहून हे नेते श्रीनगरला रवाना झाले होेते. 

राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आताच येथे येऊ नये, असे आवाहन राज्य प्रशासनाकडून करण्यात आले होते. तरीही हे सर्वजण आज सकाळी श्रीनगरला रवाना झाले होते. पण, त्यांना विमानतळावरच रोखण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी पक्षांचे सुमारे 11 नेते काश्‍मीर खोऱ्याला भेट देण्यासाठी गेले होते. ही नेतेमंडळी लोकांबरोबर संवाद साधत येथील परिस्थितीही जाणून घेणार होते. 

विरोधकांच्या या शिष्टमंडळात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक या पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांचा समावेश आहे. माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, द्रमुकचे तिरूची सिवा, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आणि तृणमूल कॉंग्रेसचे दिनेश त्रिवेदी यांचाही या शिष्टमंडळात समावेश आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Rahul Gandhi onboard flight to Srinagar