esakal | माघार घेणेच सरकारच्या हिताचे : राहुल गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

rahul-gandhi

भारत आपल्या संरक्षण क्षेत्रासाठी काहीही करत नाही, असा संदेश चीनला मिळाला आहे. एवढेच नव्हे तर, जवानांमध्येही हाच संदेश जाईल की सरकार फक्त एक टक्का लोकांना आपल्या हिश्‍श्‍याचा निधी देत आहे.

माघार घेणेच सरकारच्या हिताचे : राहुल गांधी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली -‘मोदी सरकारचा अर्थसंकल्प फक्त एक टक्का लोकसंख्येसाठीच आहे,’ अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधींनी संसदेत एक फेब्रुवारीला मांडलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘‘कृषी कायद्यांवर शेतकरी माघार घेणार नसून, आता मागे हटण्यातच सरकारचा फायदा आहे.  सरकारचे काम शेतकऱ्यांना भयभीत करण्याचे नव्हे तर संवाद साधण्याचे आहे,’’ अशीही टिपणी त्यांनी केली.

आंदोलक शेतकऱ्यांपुढे खंदक, काटेरी तारांची कुंपणे उभारणे यावरही राहुल गांधींनी संतप्त टिपणी केली. ‘‘अशी तटबंदी उभारण्यासाठी शेतकरी शत्रू आहेत का?,’’ असा सवालही त्यांनी आज पक्ष मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. अर्थसंकल्पावर टीकास्त्र सोडताना राहुल गांधी म्हणाले, ‘‘केंद्र सरकार खासगीकरणाद्वारे सर्वसामान्यांचा पैसा काही मोजक्या लोकांकडे सोपवू पाहात आहे. खरे तर या काळात लोकांच्या हातात पैसा पोहोचविण्याची गरज आहे. सरकारने न्याय योजना लागू केली असती तर, अर्थव्यवस्था सुधारली असती. पण सरकारचा भर पुरवठा साखळीला निधी देण्यावर असल्याने त्याचा सर्वसामान्यांना फायदा होणार नाही.’’

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काहीही तरतूद नसल्याचे सांगताना राहुल म्हणाले, ‘चिनी सैन्य भारतात हजारो किलोमीटरपर्यंत आत शिरले. पण केंद्राने अर्थसंकल्पात काहीही तरतूद केली नसल्याने, भारत आपल्या संरक्षण क्षेत्रासाठी काहीही करत नाही, असा संदेश चीनला मिळाला आहे. एवढेच नव्हे तर, जवानांमध्येही हाच संदेश जाईल की सरकार फक्त एक टक्का लोकांना आपल्या हिश्‍श्‍याचा निधी देत आहे.’’

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हुकूमशहा एम नावाचे का?
सर्व हुकूमशहांची नावे ‘एम’ने का सुरू होतात? असा खोचक प्रश्‍न ‘ट्विट’द्वारे करून राहुल गांधी यांनी नव्या वादाला तोंड फोडले. या ‘ट्विट’मध्ये राहुल यांनी मार्कोस, मुसोलिनी, मिलोसेविक, होस्नी मुबारक, मोबुटू, मुशर्रफ, मिकोम्बेरो हुकूमशहांच्या नावाचा उल्लेख केला होता.

राहुल म्हणाले ...
  सरकारच्या हातातून नियंत्रण सुटू लागले
  ६० टक्के शेतकरी दहशतवादी तर, आरएसएसचे लोक चांगले, हाच सरकारचा समज आहे. 
  २६ जानेवारीला दिल्लीत लाल किल्ल्यातील घटनांचे गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप