
Rahul Gandhi: राहुल गांधी शिकताहेत सुताराचं काम? पोहोचले आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केटमध्ये
नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आपल्याला वेगवेगळ्या रुपांमध्ये दिसून येत आहेत. कधी ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाताहेत, तर कधी हमाल बनून रेल्वे स्टेशनवर दिसत आहेत. कधी ते भाजीविक्रेत्यांशी संवाद साधत आहेत. त्यांनी नुकतेच दिल्लीतील कीर्तिनगरमधील फर्निचर मार्केटला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे कामही केल्याचं पाहायला मिळत आहे. (Congress leader Rahul Gandhi visits Kirti Nagar furniture market)
राहुल गांधी यांनी 'एक्स'वर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यात राहुल गांधी सुतार कामगारांशी चर्चा करताना दिसत आहेत. तसेच त्यांच्यात मिसळून काम शिकत असल्याचं दिसत आहे.
राहुल गांधी 'एक्स'वर म्हणालेत की, दिल्लीच्या कीर्तिनगरमध्ये असलेल्या आशियातील सगळ्यात मोठ्या फर्निचर मार्केटला भेट दिली. तेथे सुतार मित्रांशी संवाद साधला. हे मेहनती तर आहेतच पण मोठे कलाकारही आहेत. मजबूत आणि सुंदर फर्निचर बनवण्यात कौशल्यपूर्ण आहेत. त्यांच्याशी खूप बोललो. त्यांच्या कलेबद्दल थोडं जाणून घेतलं आणि काही शिकण्याचा प्रयत्न केला.
राहुल यांनी सुतार कामगारांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्यासोबत मिळून काही फर्निचर तयार करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांतील राहुल गांधींची ही तिसरी खास भेट आहे. याआधी त्यांनी आझाद नगरमध्ये भाजीपाला विक्रेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आनंद विहार रेल्वे स्टेशनवर हमाल कामगारांची भेट घेतली होती.
राहुल गांधी यांनी देशात भारत जोडो यात्रा सुरु केली होती. याअंतर्गत त्यांनी दक्षिण भारत ते उत्तर भारतापर्यंत पायी प्रवास केला. याकाळात त्यांनी अनेक लोकांशी संवाद साधला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते लोकांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसच्या माहितीनुसार, पूर्व-पश्चिम अशी एक यात्रा पुन्हा सुरु केली जाणार आहे. (Latest Marathi News)