लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेसचे प्रमुख नेते पळून गेले : सलमान खुर्शीद

वृत्तसंस्था
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

लोकसभा निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख नेतेच सोडून गेल्याने आता मोठे संकट आले असल्याचे खुर्शीद यांनी सांगितले.   

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावरच थेट निशाणा साधलाय. लोकसभा निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख नेतेच सोडून गेल्याने आता मोठे संकट आले असल्याचे खुर्शीद यांनी सांगितले.   

महाराष्ट्र व हरियाना विधानसभा निवडणूका तोंडावर असतानाच काँग्रेसचे कोणतेही मोठे नेतृत्व प्रचारासाठी नाही. लोकसभेत मोठा पराभव पत्कारावा लागल्याने राहुल गांधींनी तडकाफडकी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता पक्षाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे, असे खुर्शीद यांनी एका मुलाखतीत म्हणले आहे. पक्षात आव्हानात्मक स्थिती असून महाराष्ट्र व हरियानात विजयाची शक्यता अत्यंत कमी आहे, तर पक्ष आपले भविष्यही नीटसे ठरवू शकत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे सोपविण्यात आले. पण ऑक्टोबरमध्ये दोन्ही राज्यांच्या निवडणूका झाल्यानंतर पक्षाच्या नव्या अध्यक्षाबद्दल विचार केला जाईल. तसेच लोकसभा निवडणुकीत आम्हाला पराभवाचा सामना का करावा लागला याचेही विश्लेषण आम्ही करणार आहोत. महाराष्ट्र व हरियाणातील निवडणूका या काँग्रेससाठी आव्हानात्मक असणार आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Salman Khurshid speaks about Rahul Gandhi