
'शेतकरी- मजुरांच्या विरोधात रचलेलं षडयंत्र हरलंय'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कायदे रद्द झाल्यानंतर हा अहिंसेचा विजय असल्याचं म्हटलं या लढ्यात 700 हून अधिक शेतकरी कुटुंबांनी बलिदान दिलं. ज्या कुटुंबियांच्या सदस्यांनी न्यायाच्या या लढ्यात आपले प्राण दिले, त्यांचे बलिदान सार्थकी लागले आहे, असं गांधी म्हणाल्या. आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे, असं म्हणून त्यांनी मोदींच्या या निर्णयाचं स्वागत केलंय.
सोनिया गांधी यांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी काँग्रेस उभी आहे, अस म्हणतानाच मोदी सरकारला धारेवर धरलं. आज सत्तेत असलेल्यांनी शेतकरी आणि मजुरांच्या विरोधात रचलेलं षडयंत्र हरलं आहे, असं त्या म्हणाल्या. हुकूमशाही राज्यकर्त्यांचा अहंकारही त्यामुळे नष्ट झाला आहे. आज रोजीरोटी आणि शेतीवर हल्ला करण्याचा कट फसला आहे. आणि अन्नदात्यांचा विजय झाला, असं सोनिया गांधी म्हणाल्या.
लोकशाहीत कोणताही निर्णय प्रत्येक संबंधितांशी चर्चा करून आणि विरोधी पक्षांशी चर्चा करून घेतला गेला पाहिजे.. मला आशा आहे की या घटनेतून मोदी सरकारला भविष्यातील शिकवण मिळाली असेल, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
काय म्हणाले पंतप्रधान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. आज ते अनेक जलसिंचन योजनांचे उद्घाटन उत्तर प्रदेशात करणार आहेत. त्याआधी ९ वाजता मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. कृषी कायदे मागे घेणार असल्याचे मोदींनी जाहीर केले. तसंच सीमेवर सुरु असलेलं आंदोलन आता शेतकऱ्यांनी थांबवावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केलं.
मोदींनी म्हटलं की, देशात लहान शेतकऱ्यांना ताकद मिळावी यासाठी कृषी कायदे लागू करण्यात आले. अनेक वर्षांपासून हे शेतकरी ही मागणी करत होते. याआधीच्या सरकारने यावर चर्चा केली होती. यावेळी चर्चा करून हे कायदे लागू केले गेले. अनेक शेतकरी संघटनांनी या कायद्याचे स्वागत केले. ज्यांनी स्वागत केले त्यांचे मी आभार मानतो.