हम डरेंगे नही, फाईट करेंगे! ....आणि आता खर्गेंनाही ईडीचं `आवतण' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress mallikarjun kharege questions about ed summons

सेना नेते संजय राऊत यांच्यानंतर ईडीचे सम्नस मिळालेले खर्गे राज्यसभेतील दुसरे नेते असून ही ‘यादी‘ वाढणार का

हम डरेंगे नही, फाईट करेंगे! ....आणि आता खर्गेंनाही ईडीचं `आवतण'

नवी दिल्ली - संसदेचे अधिवेशन चालू असताना प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) संसद सदस्य असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या चौकशीचा जोर लावल्याचे जोरदार पडसाद राज्यसभेतही उमटले. ‘मलाही ईडीने आज १२.३० वाजता बोलावले आहे. मी कायद्याचे पालन करणार आहे. या सरकारच्या दमनकारी धोरणाला आम्ही घाबरणार नाही,‘ असे सांगताना विपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी, हम डरेंगे नही, हम फाईट करेंगे‘असे आवेशाने सांगितले. सेना नेते संजय राऊत यांच्यानंतर ईडीचे सम्नस मिळालेले खर्गे राज्यसभेतील दुसरे नेते असून ही ‘यादी‘ वाढणार का, अशी चर्चा विरोधी खासदारांत आहे.

कॉंग्रेसचे मुख्यालय व गांधी मायलेकांच्या घरांभोवती कालपासून जमलेला दिल्ली पोलिसांचा फौजफाटा तसेच यंग इंडियनचे कार्यालय ईडीकडून सील करण्याची कालची कारवाई यामुळे कॉंग्रेस सदस्य सुरवातीपासूनच संतापले होते. कामकाज सुरू होताच राज्यसभाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना बोलण्याची संधी दिली. मात्र ईडीच्या सूडबुध्दीच्या कारवाईवर नियम २६७ नियमांतर्गत सारे कामकाज तहकूब करून राज्यसभेत चर्चा घ्यावी ही त्यांची मागणी नायडू यांनी अमान्य केली. त्यानंतर दुपारी बाराला पीठासीन अधिकारी विजयसाई रेड्डी यांनीही खर्गे यांना बोलण्‍यास सांगितले. संसद चालू असताना ईडीने संसद सदस्यांना बोलवावे का, यावरून कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेससह विरोधक व भाजप सदस्यांत जोरदार वाद झाला. अनेक मंत्रीही खर्गेंच्या भाषणात अडथळा आणू लागताच कॉंग्रेस सदस्य खवळले. अधिवेशन चालू असताना मला ईडीने ‘समन्स' बजावणे हे उचित आहे का, असे कर्गे यांनी सांगताच भाजपच्या शाऊटींग ब्रिगेडला ‘इशारा‘ झाला आणि आपल्याला अडवणाऱयांना खर्गे यांनी सडकून झापून काढले.

खर्गे यांनी, ईडीने संसद चालू असताना आपल्यालाही ईडीने समन्स पाठवून आज दुपारी साडेबाराला बोलावले आहे, असा गौप्यस्फोट केला. आम्ही तुमच्या दनमकारी नीतीला घाबरणार नाही व लढत राहू असे खर्गे यांनी सांगताच पुन्हा गोंधळ झाला. आज सत्तारूढ खासदारच प्रचंड गोंधळ घालत असल्याचे अपवादात्मक दृश्यही राज्यसभेत दिसले. वेलमध्ये विरोधकांची प्रचंड घोषणाबाजी चालू असताना सरकारने आज प्रश्नोत्तराचा तास व दुपारी दोननंतर कौटुंबीक न्यायालयांबाबतच्या विधेयकांवरील चर्चा घोषणाबाजीत पूर्ण केली.

ज्यांनी संसद चालवायची त्यांचाच गोंधळ कसा ?

ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी सकाळ ला सांगितले की संसदेत सध्या विचित्र चित्र दिसत आहे. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालणे ही ज्यांची ‘जबाबदारी‘ आहे असे सत्तारूढ प७चे नेते, सभागृहाचे नेते हेच आरडाओरडा करून कामकाजात अडथळे आणत आहेत. कामकाज तहकूब होण्यात हे सत्तारूढ नेतेच सक्रिय भूमिका बजावत आहेत हीच या सरकारची असहिष्णुता आहे. आजच्या तहकुबीला पियूष गोयल हेच कारणीभूत असल्याचे चिदंबरम यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्याशेजारीच असलेले कुमार केतकर व ॲमी याज्ञिक यांनीही चिदंबरम यांच्या म्हणण्यास दुजोरा दिला.

आरोप प्रत्यारोपांच्या या मालिकेत भाजपने मात्र, तपास संस्थांच्या कारवाईत सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही, हाच दावा वारंवार केला. हे सारे ‘यांच्याच' काळात होत असेल असे सांगून गोयल म्हणाले की तपास संस्था आपले काम कायद्यानुसार करत आहेत. यांना त्याचा का त्रास होत आहे ?

यंग इंडियनचे कार्यालय ‘सील' झाले असेल तर तेथे काहीतरी संशयास्पद सापडले असणार असे सांगून संसदीय मंत्री प्रल्पाद जोशी म्हणाले की हे सारे याच लोकांनी केले आहे व आता चौकशी सुरू झाल्वर तेच आरडाओरडा करत आहेत. या देशाची न्यायपालिका अत्यंत निष्पक्ष व सक्षम आहे. तुम्ही काही (गैर) केले नसेल तर न्यायालयाला सामोरे जाण्यास का घाबरता, असाही सवाल जोशी यांनी विचारला.