'राहुल गांधींच्या जागी काँग्रेसला तरुण रक्ताची गरज'

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जुलै 2019

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या चर्चेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कर्नाटकातील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, काँग्रेस अध्यक्षपदी युवा चेहरा असावा, अशी मागणी पक्षातून होऊ लागली आहे.

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेसचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्याजागी तरुण रक्ताला संधी देण्याची गरज असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी ज्येष्ठ नेत्यांबद्दल नाराजीही दर्शविली होती. दिल्लीत नुकतीच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. या बैठकीतही राहुल गांधींनी नाराजी दर्शविली होती. त्यानंतर त्यांना राजीनामा दिला होता. अमरिंदर सिंग यांनी राहुल यांचा राजीनाम्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. आता या पदावर नव्या पिढीतील नेत्याला स्थान देण्यात यावे असे म्हटले आहे. भारतातील नागरिकांच्या पसंतीस पडेल आणि तळागाळातील नेता अशी त्याची ओळख असावी. युवा नेताच या सर्वांत मोठ्या पक्षाचा कायापालट करू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या चर्चेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कर्नाटकातील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, काँग्रेस अध्यक्षपदी युवा चेहरा असावा, अशी मागणी पक्षातून होऊ लागली आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्ष नेमण्याची पक्षाच्या कार्यकारी समितीकडे सोपविली आहे. त्यामुळे लवकरच नव्या नेत्याच्या निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Needs Young Blood To Replace Rahul Gandhi says Amarinder Singh