
अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेबाबत आपला अनुभव शेअर केला.
Congress : भारत जोडो यात्रेत चालताना खूप त्रास झाला, पण..; राहुल गांधींनी शेअर केला अनुभव
Congress Plenary Session 2023 : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसचं 85 वं अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनाचा आज (रविवार) शेवटचा दिवस आहे. काँग्रेसची ही परिषद राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेबाबत आपला अनुभव शेअर केलाय. ते म्हणाले, 'गेली चार महिने आम्ही भारत जोडो यात्रा केली. यादरम्यान आम्ही लोकांशी संवाद साधला आणि खूप काही स्पर्शानं जाणवलं. मी समोर चालत होतो आणि माझ्या पाठीमागं खूप लोक होते. मला चालताना खूप त्रास होत होता, पण मी हा त्रास कधीच जाणवू दिला नाही.
राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो यात्रेतून मला खूप काही शिकायला मिळालं. पदयात्रेतून शेतकर्यांच्या व्यथा समजून घेतल्या. यात्रेदरम्यान आम्ही शेतकरी आणि तरुणांना भेटायचो, त्यांच्याशी हस्तांदोलन करायचो. सुरुवातीला लोक विचारायचे की तुम्ही काय करत आहात, पण यात्रेच्या महिनाभरातच असं झालं की लोकांनी मिठी मारताच सर्व काही समजलं. मला लोकांना काय सांगायचं आहे, हे त्यांना लगेच समजू लागलं, असंही त्यांनी सांगितलं.
राहुल गांधी म्हणाले, 'तुम्ही केरळात बोटींची शर्यत पाहिली असेल. मी बोटीत बसलो होतो. माझ्या पायात तीव्र वेदना होत होत्या. त्या फोटोंत मी हसताना दिसतोय, पण मनातल्या मनात मी रडत होतो. मी कशाची तमा न बाळगता प्रवास सुरू केला. मी एक तंदुरुस्त माणूस आहे. 20-25 किमी चालण्यात काय मोठी गोष्ट आहे याचा मला अभिमान वाटू लागला.'
या अधिवेशनाला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या, 'आजचा काळ काँग्रेससाठी खडतर प्रवास आहे. आपल्या समस्या दूर करून आपल्याला या देशासाठी लढायचं आहे. काँग्रेसची धोरणं सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी एकत्र काम करायचं आहे. भाजपच्या विरोधात सर्व विचारधारेंनी एकत्र यावं. आज देशाला काँग्रेसकडून खूप अपेक्षा आहेत.'