Congress President Election : अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता दिग्विजय सिंह; उद्या उमेदवारी दाखल करणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress President Election :  अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता दिग्विजय सिंह; उद्या उमेदवारी दाखल करणार!

Congress President Election : अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता दिग्विजय सिंह; उद्या उमेदवारी दाखल करणार!

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये वरिष्ठ नेते दिग्विजयसिंह यांचे नाव आश्चर्यकारकरित्या पुढे आले असून उद्या ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी चर्चा वर्तुळात आहे. तर राजस्थानातील नाट्यामुळे उमेदवारी अडचणीत आलेले मुख्यमंत्री अशोक गेहलोत उद्या (ता. २९) अध्यक्षा सोनिया गांधींना भेटणार आहेत. शशी थरूर उमेदवारी अर्ज शुक्रवारी (ता. ३०) भरणार आहेत. मात्र, गांधी कुटुंबाचा उमेदवार कोण असेल यावर अजुनही संभ्रमावस्था कायम आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे गांधी कुटुंबाचा पसंतीचा उमेदवार असतील, असे मानले जात होते.

राजस्थानातील वादग्रस्त घडामोडींनंतर त्यांचे नाव मागे पडून कमलनाथ, दिग्विजयसिंह, मुकूल वासनिक, कुमारी शैलजा, के. सी. वेणुगोपाल यासारख्या अन्य नावांवर अटकळबाजी सुरू आहे. कमनलनाथ यांनी मध्यप्रदेशात लक्ष देणार असल्याचे व अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, पक्षातील सर्वोच्चपदासाठी दिग्विजयसिंह यांचे नाव सोनिया गांधींना सुचविले असल्याचेही कमलनाथ यांनी म्हटले. त्यानंतर, दिग्विजयसिंह यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली आहे. उद्या ते अर्ज दाखल करणार असेही सांगितले जाते. परंतु, दिग्विजयसिंह यांची क्षमता, स्वतंत्र बुद्धी तसेच स्वतःची समांतर संपर्क यंत्रणा पाहता गांधी कुटुंब त्यांच्यावर विसंबून राहण्याच्या मनस्थितीत आहे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आणि शिस्तभंग कारवाई समितीचे अध्यक्ष ए. के. अॅन्टनी दिल्लीत पोहोचले असून त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. तर, सचिन पायलट यांची प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासमवेत बैठक झाली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत उद्या सोनिया गांधींना भेटणार आहेत. या भेटीगाठीच्या पार्श्वभूमीवर, दिग्विजयसिंह यांनी अर्ज भरला तरी अध्यक्षपदाच्या अंतिम लढतीत गांधी कुटुंबाचा उमेदवार कोण असेल याचे उत्तर सोनिया-गेहलोत भेटीनंतरच स्पष्ट होईल.

माजी केंद्रीय मंत्री आणि नेहरू-गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत आले आहे. उमेदवारीचा तिढा आजही सुटला नाही. त्यामुळे नवनवीन नावे समोर येत आहेत. यात आता खर्गे यांचे नाव समोर आले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सांगितल्यास खर्गे अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात, असे एका सूत्राने सांगितले. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधी यांना सांगितले की, पक्ष जो काही निर्णय घेईल, त्याचे आपण पालन करू. शेवटी पक्ष (सोनिया गांधी) जे सांगेल, तेच करू.