
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर हमालांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. आज त्यांनी हमालांबरोबरचा व्हिडिओ ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर करत विक्रमी बेरोजगारी आणि कंबरडे मोडणाऱ्या महागाईकडे लक्ष वेधले.
भारताचे ओझे वाहणारे खांदे आज ‘मजबुरी’मुळे वाकले आहेत. मात्र, तरीही कोट्यवधी भारतीयांप्रमाणे या हमालांच्या मनातही हेही दिवस जातील, अशी आशा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी हमालाचा गणवेश परिधान करत प्रवाशांचे सामानही वाहून नेले होते. या व्हिडिओ राहुल गांधी हमालांशी संवाद साधताना दिसतात. या हमालांनी त्यांच्याकडे निवृत्तिवेतन व निवाऱ्याची सुविधा नसल्याची समस्या मांडली.
राहुल गांधी म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी भाजीपाला विक्रेते असलेल्या रामेश्वरजी यांची मी भेट घेतली होती. हे समजताच काही हमालबंधूंनीही त्यांची भेट घेण्याचीही विनंती केली. त्यानुसार मी दिल्लीतील हमालांची भेट घेत संवाद साधला. आज देशभरात लाखो शिक्षित युवकसुद्धा रेल्वे स्थानकांवर हमाल बनून काम करत आहेत.
यापैकी काहींकडे अभियांत्रिकीची पदवी आहे तरीही त्यांना नोकरी मिळत नाही याचे कारण, विक्रमी बेरोजगारी. हमालांना प्रतिदिन केवळ ४०० ते ५०० रुपये मिळतात. त्यातून, ते घरखर्चही भागवू शकत नाहीत तर बचतीचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांना निवृत्तिवेतन नाही, आरोग्य विमा व मूलभूत सुविधाही दिल्या जात नाहीत.’’
मोदी सरकारचे दुर्लक्ष : रमेश
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी राहुल गांधी यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. राजस्थानातील एका हमालाच्या आईला राज्य सरकारच्या चिरंजीवी योजनेतंर्गत विनामूल्य उपचार मिळाले. मात्र, त्यांना मोदी सरकारकडून कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. देशाचे ओझे वाहणाऱ्यांकडे मोदी सरकार तसेच प्रसारमाध्यमेही दुर्लक्ष करत आहेत, असा आरोपही रमेश यांनी केला.
भारतात सर्वाधिक कष्टाळू लोकांमध्ये हमालांचा समावेश होतो. पिढ्यानपिढ्या ते लाखो प्रवाशांना त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मदत करत आहेत. हमाल आपली जबाबदारी निभावत असले तरी त्यांची खूपच थोडी प्रगती झाली आहे.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते