अमित शहा म्हणतात, 'काँग्रेसला लाज वाटली पाहिजे'

वृत्तसंस्था
Sunday, 1 September 2019

- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कलम 370 वर केलेल्या वक्तव्याची पाकिस्तानच्या संसदेत होतेय स्तुती.

- काँग्रेसने आतातरी लाज बाळगायला हवी.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कलम 370 वर केलेल्या वक्तव्याची पाकिस्तानच्या संसदेत स्तुती होत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा वापर पाकिस्तानकडून केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसने आतातरी लाज बाळगायला हवी, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. 

दादरा नगर हवेली येथील एका कार्यक्रमात अमित शहा बोलत होते. ते म्हणाले, कलम 370 वरील राहुल गांधी यांच्या वक्तव्याची पाकिस्तानच्या संसदेत स्तुती केली जाते. काँग्रेसच्या या वक्तव्याचा वापर संयुक्त राष्ट्र संघात सादर केलेल्या याचिकेत केला गेला. तसेच सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक असो काँग्रेसने अशा गंभीर मुद्द्यांवर सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना कोणत्या प्रकारचे राजकारण करायचे आहे?, असा सवालही अमित शहा यांनी केला.

दरम्यान, कलम 370 वरून देशातील जनता पंतप्रधान मोदी यांच्यासोबत ठामपणे उभी आहे. मोदींना देशाने पुन्हा पंतप्रधान बनवले आणि मोदींनी संसदेच्या पहिल्याच सत्रात कलम 370 हटवले. मोदींशिवाय हे काम कोणीच करू शकत नव्हते, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress should be ashamed says Amit Shah