काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची तयारी; बड्या नेत्यांची होणार बैठक

टीम ई-सकाळ
Sunday, 23 August 2020

राजस्थानमधील पक्षांतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आल्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पक्षातील बदलाविषयी चर्चा झाली होती. त्यात राज्यसभा सदस्य राजीव सातव यांनी पक्षाच्या स्ट्रॅटेजीविषयी काही स्पष्ट मतं व्यक्त केली होती. 

नवी दिल्ली : देशातील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये (Indian National Congress) सध्या नेतृत्व बदलाची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. याविषयावर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिले असून, पक्ष नेतृत्वा संदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी पत्रात केली आहे. काँग्रेस कार्यकारिणीतील बड्या नेत्यांची उद्या (सोमवार, 24 ऑगस्ट) बैठक होणार आहे. त्यात बैठकीत नेतृत्वबदलाविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.

देशभरातील इतर घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

काय चाललंय काँग्रेसमध्ये?
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तात्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल (Rahul Gandhi) गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षाचं अध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी पक्षाच्या प्रभावी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारी होती. सोनिया गांधी यांचे वय 73 आहे. त्यामुळं प्रकृतीच्या कारणास्तव अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास, उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु, गेले वर्षभर सोनिया गांधी पक्षाच्या प्रभारी अध्यक्ष आहेत. गेल्या काही दिवसांपासून पक्षात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली. विशेषतः राजस्थानमधील (Rajasthan Congress) पक्षांतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आल्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पक्षातील बदलाविषयी चर्चा झाली होती. त्यात राज्यसभा सदस्य राजीव सातव यांनी पक्षाच्या स्ट्रॅटेजीविषयी काही स्पष्ट मतं व्यक्त केली होती. 

जगभरातील इतर घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राहुल गांधींसाठी आग्रह
पक्षातील काही नेते विशेषतः तरुण नेते, पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्वाची धुरा देण्यासाठी आग्रही आहेत. पक्षाच्या विविध पातळ्यांवर राहुल यांच्या नेतृत्वासाठी आग्रह करण्यात येत आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ तरुण नेतेच नव्हे तर, ज्येष्ठ नेतेही पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळेच जेष्ठ नेत्यांनी तसेच, आमदार, खासदारांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्वाविषयी फेरविचार करण्याची विनंती केलीय. 

काय होणार उद्याच्या बैठकीत?
उद्या काँग्रेस कार्यकारिणीतील बड्या नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत काही नेते सोनिया गांधी यांनीच पुढील काही काळ नेतृत्व करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. तर, सोनिया यांनी नकार दिल्यास राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी-वद्रा यांची नावे काँग्रेस नेतृत्वासाठी पुढं येण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress top leaders to meet over leadership