'जमाते इस्लामी'चे कनेक्‍शन 'आएसआय'शी

पीटीआय
रविवार, 10 मार्च 2019

केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातलेली "जमाते इस्लामी जम्मू आणि काश्‍मीर' या संघटनेचे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयशी संबंध होते, तसेच या संघटनेचे म्होरके नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांसोबत सातत्याने संपर्क साधत असत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातलेली "जमाते इस्लामी जम्मू आणि काश्‍मीर' या संघटनेचे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयशी संबंध होते, तसेच या संघटनेचे म्होरके नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांसोबत सातत्याने संपर्क साधत असत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

"हुर्रियत कॉन्फरन्स'मधील या संघटनेचा हक्काचा माणूस म्हणजे सईद अली शाह गिलानी हा होय, कधीकाळी त्याला "आमीर-ए- जिहाद' ही पदवी बहाल करण्यात आली होती. या संघटनेने कारवायांसाठी मदत मिळावी म्हणून "आयएसआय'शी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले होते. काश्‍मिरी तरुणांना शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना शस्त्र पुरवठा करण्याचे कामदेखील ही संघटना करत होती. यासाठी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांचे कार्यालय काम करत होते अशी माहिती सूत्रांनी दिली.

"जमाते इस्लामी' ही संघटना काश्‍मीर खोऱ्यातील मुलांमध्ये भारतविरोधी भावना रूजविण्यासाठी तिच्या शाळांच्या नेटवर्कचा आधार घेत होती. याच संघटनेची युवा शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "जमियत ऊल तुल्बा' ही संघटना अधिकाधिक तरुणांनी दहशतवादाकडे वळावे म्हणून प्रयत्नशील होती. 

अन्य देशांतही अस्तित्व

विशेष म्हणजे याच संघटनेतील काही कट्टरपंथीय मेंदूंनी "ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्स' आणि "हिज्बुल मुज्जाहिद्दीन' या संघटनांची स्थापना केली होती. पाकिस्तान, पाकव्याप्त काश्‍मीर आणि बांगलादेशातही या संघटनेच्या शाखा असून येथेही या संघटनेच्या नेत्यांवर देशविरोधी कारवायांचा ठपका ठेवत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. काश्‍मीर खोऱ्यातच "हनाफी ऐतखादी' पंथाविरोधातही "जमाते इस्लामी'ने प्रचार करत येथील वातावरण कलुषित केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Connection of Jamaat e Islami with ISI