'एम्स'मधील आग नियंत्रणात 

वृत्तसंस्था
रविवार, 18 ऑगस्ट 2019

संस्थेच्या पीसी ब्लॉकमध्ये ही आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आज दुपारी लागलेली आग अग्निशामक दलाने सायंकाळी नियंत्रणात आणली. आगीत वैद्यकीय नमुने; तसेच अहवालांचे नुकसान झाले; मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 

संस्थेच्या पीसी ब्लॉकमध्ये ही आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाजवळील एबी वॉर्ड येथे ही पाच वाजता ही आग लागली होती. त्याच्यावरच शस्त्रक्रिया दालने (ऑपरेशन थिएटर) आहेत. तेथील सर्व रुग्णांना सुरक्षित जागी नेण्यात आले. 

आगीचे वृत्त कळताच, अग्निशामक दलाचे 22 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. दुपारी लागलेल्या या आगीत पीसी ब्लॉकच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यांचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आग आटोक्‍यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून एबी-1 ते एबी-7 या वॉर्डांतील रुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले. पीसी ब्लॉकमध्ये फक्त संशोधन प्रयोगशाळा; तसेच डॉक्‍टरांच्या खोल्या आहेत. मात्र, सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विषाणू युनिट आगीत भस्म झाले. 

भाजपचे नेते अरुण जेटली यांच्यावर याच संस्थेच्या दुसऱ्या विभागात उपचार सुरू असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बड्या नेत्यांची सध्या तेथे रीघ लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In control of the fire in AIIMS