esakal | केंद्राला घ्यावा लागणार कठोर निर्णय; 15 दिवसांत महाराष्ट्रासह कर्नाटक, यूपीमध्येही स्फोट
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Hike In India

केंद्राला घ्यावा लागणार कठोर निर्णय; 15 दिवसांत महाराष्ट्रासह कर्नाटक, यूपीमध्येही स्फोट

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येने हाहाकार माजवला आहे. कोरोनाची दुसरी लाट पुन्हा एकदा संपूर्ण भारतात थैमान माजवताना दिसून येत आहे. भारतातील एकूण रुग्णसंख्येपैकी महाराष्ट्रातील दैनंदिन वाढणारी रुग्णसंख्या ही जवळपास 60 ते 65 टक्के आहे. काल मंगळवारी भारतात 1 लाख 84 हजार 372 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची ही आकडेवारी डोळे विस्फारणारी अशीच असून ती आतापर्यंत आढळलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येपैकी सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. 31 मार्च ते 13 एप्रिल या गेल्या साधारण दोन आठवड्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये झालेली वाढ ही निश्चितच चिंताजनक आणि धक्कादायक आहे. भारतात आलेली ही कोरोनाची दुसरी लाट समजली जात असून आता पुन्हा एकदा प्राप्त परिस्थितीबाबत भीतीचं वातावरण आहे.

महाराष्ट्राखालोखाल इतरही अनेक राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये फक्त गेल्या पंधरा दिवसांमध्ये 1 लाख 7 हजार 586 रुग्णांची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वांत मोठं राज्य असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र, या राज्यात दैनंदित व्यवहारांवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळं येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशातील रुग्ण संख्या आणखी झपाट्याने वाढेल, अशी शक्यता आहे. कालच्या आकडेवारीनुसार राज्यात 24 तासांत 18 हजार 021 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हरियाणामध्ये देखील रुग्णसंख्या वाढत असून गेल्या पंधरा दिवसांमध्ये त्याठिकाणी 11 हजार 953 रुग्ण आढळले आहेत. याच ठिकाणी सध्या हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं असून कोरोनाच्या नियमावलीला धाब्यावर बसवून या आयोजनाला प्रशासनाने परवानगी दिली आहे. दिल्लीमध्ये गेल्या पंधरा दिवसांमध्ये 89 हजार 545 नवे रुग्ण आढळले आहेत. तर कर्नाटक राज्यात 90 हजार 868 रुग्ण मिळाले आहेत. अनेक राज्यांमधील हॉटस्पॉट शहरांमध्ये सध्या नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.

निवडणुका असलेल्या राज्यात काय आहे परिस्थिती?
देशात सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तमिळनाडू या राज्यांमध्ये तर पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात या निवडणुका होत आहेत. मात्र, या निवडणुकांमध्ये कोरोनाच्या कसल्याही नियमांचं पालन गांभीर्याने न होता अत्यंत निष्काळजीपणाने प्रचार केला जात आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या लाखोंच्या सभा आणि रॅली या कसल्याही सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळताच पार पाडल्या जात आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी देखील कोरोनाची रुग्णसंख्या येत्या काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या पंधरा दिवसांमध्ये 38 हजार 291 रुग्ण आढळले आहेत तर तमिळनाडूमध्ये 63 हजार 35 रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये 58 हजार 466 रुग्ण सापडले आहेत. आसाममध्ये 3 हजार 120 रुग्ण सापडले आहेत.

महाराष्ट्रात संचारबंदी
महाराष्ट्र राज्यात कोरोनाची रुग्णवाढ अत्यंत वेगाने होत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत पुढील 15 दिवस राज्यामध्ये संचारबंदी जाहीर केली आहे. यानुसार, आज बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून ते एक मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्‍यक आणि इतर काही सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापने बंद असतील. या संचारबंदीचा गरीब आणि कष्टकरी वर्गाला फटका बसू नये यासाठी 5,476 कोटी रुपयांची विशेष आर्थिक मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

CBSE ची दहावीची परिक्षा रद्द
कोरोनाचा देशावरील विळखा पुन्हा एकदा घट्ट होत असताना आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, तर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बुधवारी (ता.१४) जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी यासंदर्भात बैठक आयोजित केली. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय शिक्षण सचिव आदी अधिकारी त्यासाठी त्यात हा निर्णय घेण्यात आला.

loading image
go to top