कोरोना भीती नको काळजी हवी!

Corona
Corona

गैरसमज असेही...  
‘हँड ड्रायर’ कोरोनाचा विषाणू रोखू शकते?
उत्तर :
नाही, हात साबणाने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. ते धुतल्यानंतर
तुम्ही ते कशाने कोरडे करता, याला फारसे महत्त्व नसते.

अतिनील किरणांचे दिवे कोरोनाच्या विषाणूंना मारतात का?
उत्तर :
हाताच्या निर्जुंतुकीकरणासाठी या किरणांचा वापर करू नये; कारण त्यामुळे
त्वचाविकार बळावण्याचा धोका असतो.

कोरोनाबाधितांची ओळख पटविण्यात थर्मल स्कॅनर कितपत उपयोगी ठरतो?
उत्तर :
विषाणूच्या संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीला ताप आला असेल, तर त्याची ओळख पटू शकते. पण, संबंधित व्यक्ती आजारी नसेल किंवा तिला तापही आलेला नाही अशा व्यक्तीमधील संसर्ग ओळखता येत नाही. सर्वसाधारणपणे कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला ताप येण्यासाठी किंवा ती आजारी पडण्यासाठी दहा दिवसांचा अवधी लागतो.

संपूर्ण शरीरावर अल्कोहोल अथवा क्लोरीन फवारल्याने विषाणू मरतात का?
उत्तर :
नाही. शरीरामध्ये आधीच गेलेले विषाणू अल्कोहोल अथवा क्लोरीनमुळे मरत नाहीत. यामुळे उलट त्वचेलाच संसर्ग होण्याची भीती असते. या दोन्ही घटकांमुळे केवळ पृष्ठभागावरीलच जंतू मरतात. 

पाळीव प्राण्यांपासून विषाणूचा प्रसार होतो का?
उत्तर :
सध्यातरी या प्राण्यांपासून विषाणूचा प्रसार होत असल्याचे दर्शविणारे कोणतेही ठोस पुरावे संशोधकांच्या हाती लागलेले नाहीत. पण, या प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने धुणे कधीही चांगले.

लसूण खाल्ल्याने संसर्ग कमी होतो का?
उत्तर :
लसणामध्ये आरोग्याला पूरक असे बरेचसे घटक असतात; पण ते या विषाणूला रोखू शकत नाहीत.

तिळाच्या तेलामुळे संसर्ग थांबतो का?
उत्तर :
नाही, हे तेल नव्या कोरोना विषाणूचा सामना करू शकत नाही.

कोरोना विषाणूवर औषध आहे काय?
उत्तर :
सध्या तरी नाही.

भारताला धोका का?
उत्तर : दाट लोकवस्ती, विस्कळित आरोग्य यंत्रणा, स्थलांतराचे अधिक प्रमाण यामुळे धोका आहे.

बचाव कसा करावा?
कोरोना संसर्गजन्य आजार असून तो झपाट्याने पसरत आहे. चीनमध्ये उमग झालेला कोरोना आता भारतात आणि पुण्यातही पोचला आहे. त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने पुरेशी काळजी घेणे आवश्‍यक आहे. पुढील उपाययोजना केल्यास कोरोनापासून आपण बचाव करू शकतो:

  • ठराविक वेळाने तुमचे हात शक्यतो साबणाने अथवा हॅण्डवॉश किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवा. साबणाचा पुरेसा फेस होईल, याची काळजी घ्या. 
  • खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या व्यक्तींपासून इतर व्यक्तींनी किमान एक मीटर (तीन फूट) अंतर दूर राहावे.
  • हात न धुता डोळे, नाक किंवा तोंडाला लावू नये. विषाणूबाधित हात डोळे, नाक किंवा तोंडाला लावल्यास त्याची बाधा होण्याची शक्‍यता असते.
  • श्‍वसनावाटे बाधा होत असल्याने खबरदारी म्हणून मास्क, हॅण्डग्लोव्हजचा वापर करावा. एन-९५ मास्कमुळे विषाणूजन्य आजारांपासून बचाव करता येतो.
  • सर्दी, खोकला, ताप असल्यास शक्‍यतो घराबाहेर पडू नये. तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • कोरोनाबाधित परिसरातून आलेल्या लोकांनी घ्यावयाची काळजी

चीन, जपान, कोरिया, इटली आदी कोरोनाबाधित देशांमधून आलेल्या लोकांनी कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्‍टरांची भेट घेऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. सेल्फ आयसोलेशन (व्यक्तिगत विलगीकरण) करून घ्यावे. किमान १४ दिवसांपर्यंत इतर लोकांच्या संपर्कात न येण्याची काळजी घ्यावी. 

कोविड-१९ काय आहे?
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचे ‘कोविड-१९’ असे नामकरण करण्यात आले. डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान प्रांतात या आजाराचा उगम झाला. अनेक दिवस असलेला ताप, सर्दी, खोकला, थकवा ही कोरोनाची प्रमुख लक्षणे मानली जातात. काही रुग्णांमध्ये अंगदुखी, सांधेदुखी, चोंदलेले नाक, कोरडा खोकला आदी लक्षणेही आढळतात. हा आजारा अचानक होत नसून हळूहळू या आजाराची लक्षणे दिसून येतात. वातावरण बदलामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या विषाणूजन्य आजाराप्रमाणेच असलेली लक्षणे कोरोनाचीही असल्याने अनेकजण भयभीत होत आहेत. मात्र, या प्रकारची लक्षणे असलेल्या सर्वांनाच कोरोनाची लागण झालेली असते असे नाही. त्यामुळे वरील लक्षणे आढळलेल्या रुग्णांनी नेहमीप्रमाणे वैद्यकीय उपचार घेतल्यास ते बरेही होत आहेत; ताप, सर्दी, खोकला आदी उपचार घेऊनही बरे होत नसल्यास तात्काळ विशेषतज्ज्ञांकडे जाऊन उपचार घेण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

कोरोनाची लस उपलब्ध आहे?
सध्या तरी जगात कोरोना आजारावर उपचार करणारी कोणतीही लस उपलब्ध नाही. मात्र, कोरोनाची लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर सपोर्टिव्ह ट्रिटमेंट (सहायकारी उपचार) केली जाते. गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेतले जाते. सध्या प्रयोगशाळांमध्ये कोरोना आजारावर लस शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू आहे. 

कसा पसरतो हा आजार?
कोरोना संसर्गजन्य असल्याने तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पोचतो. खोकल्याने, शिंकण्याने तसेच थुंकल्याने आजाराच्या विषाणूंचा प्रसार होतो. त्या विषाणूच्या संपर्कात असलेल्या वस्तू, व्यक्ती किंवा पदार्थांवर ते विषाणू जाऊन बसतात. हवेवाटेही कोरोनाचे विषाणू पसरत असल्याने परिसरातील व्यक्तींना नाकावाटे, तोंडावाटे कोरोनाची बाधा होते. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही श्‍वसनावाटे हा आजार होण्याची शक्‍यता असते.

विषाणू म्हणजे काय?
सूक्ष्म, परजीवी, जीवाणूंपेक्षाही आकाराने लहान आणि स्वतःहून पालनपोषण न करता येणारा जीव म्हणजे विषाणू (व्हायरस) होय. सामान्यपणे हवेवाटे, पाण्यावाटे आणि संसर्गावाटे विषाणूंचा प्रसार होतो. २००९ साली पसरलेला ‘स्वाइन फ्लू’, २०१४ साली पसरलेला ‘इबोला’ आणि आता जगभर पसरलेला ‘कोरोना’ आदी विषाणूजन्य आजारांची उदाहरणे. विषाणूजन्य आजारांच्या प्रसारावरून त्याचे एपिडेमिक आणि पॅन्डेमिक असे प्रकार पडतात. 

कसे होते निदान? 
घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) त्याचे निश्‍चित निदान होते. तसेच, देशात १४ प्रयोगशाळांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. 

यामुळे होत नाही कोरोना

  • अंडी, मांसाहारातून कोरोना विषाणूंचा संसर्ग होत नाही.
  • चायनीज अन्नपदार्थ किंवा वस्तूंतून संसर्गाची शक्‍यता नाही.
  • प्रत्येक सर्दी, खोकला, ताप म्हणजे कोरोनाचा संसर्ग नसतो.

1) पॅन्डेमिक
जेव्हा एखाद्या विषाणूजन्य आजारांचा प्रसार नियंत्रणाबाहेर जातो, त्याला पॅन्डेमिक असे म्हणतात. 
विस्तृत भौगौलिक परिसरात त्याचा प्रसार होतो.
उदा. स्वाइन फ्लू, कॉलरा (पटकी), प्लेग, कांजिण्या आदी. 

2) एपिडेमिक
एखाद्या ठरावीक भौगोलिक परिसरात पसरलेल्या विषाणूजन्य आजाराला एपिडेमिक असे म्हणतात. 
यामध्ये एखादा देश किंवा राज्यात त्याचा झपाट्याने प्रसार होतो.
उदा. चिकनगुनिया, इबोला, कोरोना आदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com