Corona Updates: देशातील बाधितांचा आकडा 90 लाखांच्या वर

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 20 November 2020

मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची प्रतिदिन रुग्णवाढ 30 हजारांच्या खाली आली होती. पण आता रुग्णवाढीने मोठा वेग पकडला आहे. 

नवी दिल्ली: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार देशात वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे 45 हजार 882 रुग्ण आढळले असून 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या 90 लाखांच्या वर गेली आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची प्रतिदिन रुग्णवाढ 30 हजारांच्या खाली आली होती. पण आता रुग्णवाढीने मोठा वेग पकडला आहे. 

आतापर्यंत देशात कोरोनाच्या एकूण 90 लाख 4 हजार 366 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर एकूण मृत्यूंचा आकडा 1 लाख 32 हजार 162 वर गेला आहे. सध्या देशभरात कोरोनाचे  4 लाख 43 हजार 794 रुग्ण उपचार घेत आहेत. मागील 24 तासांत सक्रिय रुग्णांची संख्या 491 ने कमी झाली आहे. 

दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण चांगलं आहे. आतापर्यंत देशात 84 लाख 28 हजार 410 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाचा रिकव्हरी रेट तब्बल 93 टक्क्यांवर गेला आहे. मागील 24 तासांत देशात 44 हजार 807 जणांनी कोरोनावर (COVID19) मात केली आहे.

गुरुवारी देशात कोरोनाच्या 10 लाख 83 हजार 397 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशात 12 कोटी 95 लाख 91 हजार 786 पार पडल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients in India cross 90 lakh