Corona Updates: दिलासादायक! देशातील प्रतिदिन रुग्णवाढ 30 हजारांच्या खाली

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 17 November 2020

वाढत्या कोरोना चाचण्यांमुळे कोरोनाचे रुग्ण ट्रेस करण्यात मोठा फायदा होत आहे.

नवी दिल्ली: दिवसेंदिवस देशातील प्रतिदिन कोरोना रुग्णवाढ कमी होत आहे. मागील 24 तासांत कोरोनाच्या 29 हजार 164 रुग्णांचं निदान झालं असून 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशातील कोरोना (COVID19) बाधितांचा आकडा 88 लाख 74 हजार 291 वर गेला आहे तर एकून मृत्यूंची संख्या 1 लाख 30 हजार 519 झाली आहे. 

सध्या देशात कोरोनाचे 4 लाख 53 हजार 401 रुग्ण सक्रिय आहेत. मागील 24 तासांत सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 77 ने कमी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात 82 लाख 90 हजार 371 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच मागील 24 तासांत 40 हजार 791 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

वाढत्या कोरोना चाचण्यांचा फायदा-
वाढत्या कोरोना चाचण्यांमुळे कोरोनाचे रुग्ण ट्रेस करण्यात मोठा फायदा होत आहे. मागील 24 तासांत कोरोनाच्या तब्बल 8 लाख 44 हजार 382 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत 12 कोटी 65 लाख 42 हजार 907 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

सर्वात कमी रुग्ण-
जगभरात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना भारतातील परिस्थिती दिलासादायक आहे. जगभराचा विचार केला तर सध्या भारतात 10 लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी रुग्ण आहेत. भारतात सध्या 10 लाख लोकसंख्येमागे 6 हजार 387 कोरोना रुग्ण आहेत. यातही दिलासादायक बाब म्हणजे 15 राज्ये अशी आहेत जिथं देशाच्या सरासरीपेक्षा कमी रुग्ण आहेत. 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona recovered cases reaches near 89 lakh