खुशखबर! भारताला डिसेंबरमध्येच मिळणार कोरोनावरील लस

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 3 December 2020

भारतातही डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली- ब्रिटेनमध्ये कोरोना लस फायझरला (Pfizer-BioNTech Corona Vaccine News) आपातकालीन वापरासाठी मंजूरी मिळाली आहे. पुढील आठवड्यापासून लस लोकांसाठी उपलब्ध होणार आहे. भारतातही डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया (Dr Randeep Guleria News) यांनी डिसेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत कोविड-19 लशीच्या वापराला मंजूरी मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे. 

भारतात लवकरच मिळेल कोरोना लशीला मंजूरी

गुरेलिया म्हणाले की, ''भारतातील कोरोना लशीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. आशा आहे की भारतीय नियामक मंडळ याच्या आपातकालीन वापरासाठी मंजूरी देईल. यानंतर आम्ही लोकांना लस देण्यास सुरुवात करु शकतो. आमच्याकडे कोरोना लस सुरक्षित असल्याचा डेटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. लशीच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आतापर्यंत 70 ते 80 हजार स्वयंसेवकांना कोरोना लस देण्यात आली आहे आणि कोणत्याही स्वयंसेवकामध्ये याचे गंभीर दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत.''

गुलेरिया यांचं मोठं वक्तव्य

देशात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसांपूर्वी या लशीच्या प्रभावीतेवर आक्षेप घेत एका चेन्नईतील स्वयंसेवकाने 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर गुलेरिया म्हणाले की, ''स्वयंसेवकामध्ये दिसलेला आजार दुसऱ्या कारणामुळे झाला आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोना लस दिली आहे. काही लोकांना अन्य आजार असू शकतात.''

दरम्यान, भारतात कोरोना लस विकसीत करण्यामध्ये पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी या इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान लशीला मंजूरी मिळवण्यासाठी दोन आठवड्यांमध्ये अर्ज करणार असल्याचे सांगितले आहे. भारतीय नियामक मंडळाने लशीच्या वापराला मंजूरी दिल्यास आपातकालीन वापरासाठी ती लस उपलब्ध होऊ शकते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Vaccine News Dr Randeep Guleria said we will gate soon