esakal | केंद्राकडून निर्णयांचा धडाका; परदेशातील 4 लशींना मान्यता?

बोलून बातमी शोधा

corona vaccine
केंद्राकडून निर्णयांचा धडाका; परदेशातील 4 लशींना मान्यता?
sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कोरोनाप्रतिबंधक परदेशातील मान्यताप्राप्त लशींचा भारतातील वापराचा मार्ग मोकळा होणार असून यासंदर्भात शासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. देशातील लसीकरणाचा वेग वाढविण्याबरोबरच संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून यासाठी शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घेतले जात आहेत. परदेशात वापरल्या जाणाऱ्या आणखी चार लशींना भारतामध्ये देखील परवानगी मिळू शकते. या लशी भारतात पहिल्यांदा शंभर रुग्णांना देण्यात येतील, सात दिवस त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात येईल. यातून नेमके काय निष्कर्ष येतात त्यावर पुढील लसीकरणाची रणनीती आखण्यात येईल, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. परदेशात तयार झालेल्या आणि तेथील नियामक यंत्रणांनी ज्यांच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे तसेच जागतिक आरोग्य संघटनेने देखील आपल्या यादीमध्ये ज्यांचा समावेश केला आहे, अशा लशींचा येथेही आपत्कालीन वापर करण्यास मान्यता देण्यात येईल. यामुळे परदेशातील लशी वेगाने भारतामध्ये येऊ शकतील तसेच औषधासाठी लागणारे साहित्य आणि अन्य सामग्रीची देखील वेगाने आयात करता येईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.

‘व्हॅक्सिन ॲडमिनिस्ट्रेशन फॉर कोव्हिड-१०’ च्या तज्ज्ञांच्या समितीने शिफारस केल्यानंतर सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. भारतामध्ये सध्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सिरमची कोव्हिशिल्ड या दोन लशींचा लसीकरणासाठी वापर केला जातो आहे.

हेही वाचा: देशात कोरोना रुग्णांची संख्या का वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितली 4 कारणं

रशियाच्या लसीलाही मान्यता

देशाच्या औषध नियंत्रकांनी सोमवारी रशियन बनावटीच्या ‘स्पुटनिक-व्ही’ या लसीच्या वापरास सशर्त परवानगी दिली. कालच या लसीच्या वापराबाबत शिफारस करण्यात आली होती. ही लस मॉस्कोमधील गामालेया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या संस्थेने तयार केली आहे. माणसातील सर्वसामान्य सर्दीला कारणीभूत ठरणाऱ्या दोन विषाणूंना एकत्र आणून या लसीची निर्मिती करण्यात आली आहे. हैदराबादेतील रेड्डीज लॅबने या लसीच्या वापराला भारत सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष हाती आले असून तिची प्रतिकारक्षमता ९१.६ टक्के एवढी आहे. विशेष म्हणजे या लसीमुळे कोणत्याही प्रकारची ॲलर्जी होत नाही.