Coronavirus: गायिका कनिका कपूरविरोधात गुन्हा दाखल 

वृत्तसंस्था
Saturday, 21 March 2020

कनिका कपूरला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून उपचारासाठी तिला पूर्णपणे एकांतवासात ठेवण्यात आले आहे. ती दहा दिवसांपूर्वी ब्रिटनहून विमानाने लखनौला आली होती. त्यानंतर तिला ताप आला होता. तिने स्वत:ची तपासणी करून घेतली असता तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितले.

लखनौ : बॉलिवूडमधील आघाडीची गायिका कनिका कपूर हिने कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे माहिती असूनही समारंभात सहभागी होऊन माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी तिच्याविरोधात लखनौमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कनिका कपूरला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून उपचारासाठी तिला पूर्णपणे एकांतवासात ठेवण्यात आले आहे. ती दहा दिवसांपूर्वी ब्रिटनहून विमानाने लखनौला आली होती. त्यानंतर तिला ताप आला होता. तिने स्वत:ची तपासणी करून घेतली असता तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितले. मात्र, तरीही ती हायप्रोफाईल पार्टीमध्ये सहभागी झाली होती. कनिकाने आयोजित केलेल्या मेजवानीस उपस्थित राहणारे तीन बड्या राजकीय नेत्यांनी एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

सध्या कनिका आणि तिच्या कुटुंबीयांना एकांतवासात ठेवण्यात आले असून दरम्यानच्या काळात कनिका ज्या व्यक्तींच्या संपर्कात आली होती, त्यांचाही शोध घेऊन तपासणी केली जात आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, त्यांचे पुत्र दुष्यंतसिंह, तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन आणि अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल या मंडळींनी आता एकांतवास स्वीकारला आहे. दुष्यंतसिंह हे काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमामध्येही सहभागी झाले होते. तेथे ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटले होते, अशी माहिती समोर आली आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेदेखील त्यांची आरोग्य तपासणी करून घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus fir lodged against singer kanika kapoor