Coronavirus : देशात कोरोनाचा वेगाने फैलाव; 24 तासांत वाढले एवढे रुग्ण

Corona-in-India
Corona-in-India

नवी दिल्ली - कोरोनाच्या विषाणूचा देशात फैलावण्यात वेग २४ तासांत लक्षणीयरित्या वाढला असून संपूर्ण देशातील रुग्णसंख्या १,५६५ वर पोचली आहे. रुग्ण संख्येची ही वाढ भयावह स्थितीत पोचण्याची लक्षणे मानली जातात.

गेल्या २४ तासांत २१८ नवे बाधित रुग्ण आढळले असून बळी गेलेल्यांची संख्याही ४८ वर पोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ३०२ तर केरळमध्ये २४१ रुग्ण आहेत. दिल्लीत कोरोनाचे २४ नवे रुग्ण असून एकूण संख्या ९७ वर पोचली आहे. यातील २४ जण तबलीगे मरकसच्या कार्यक्रमात सहभागी झालेले निजामुद्दीन भागातील असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि केरळपाठोपाठ उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणमध्ये कोरोनाबाधितांची मोठी संख्या आहे. तेलंगणामध्ये मृतांचा आकडा एका रात्रीत सहावर गेल्याने चिंतेचे वातावरण आहे.

आरोग्यमंत्र्यांचा आढावा
आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. कोरोनाव्हायरसचा फैलाव समूह लागण होण्याच्या टप्प्यात जाण्यापासून रोखण्यासाठी आवश्‍यक उपायांचा आढावा त्यांनी घेतला. कोरोनाच्या परिस्थितीवर पंतप्रधान कार्यालय आणि विशेष मंत्रिगट बारकाईने लक्ष ठेवून आहे. स्वतः पंतप्रधान मोदी दर तासाला आढावा घेत आहेत.

निवारागृहांची मजुरांना भीती
राजधानी दिल्लीमध्ये रात्र निवारागृहांची संख्या वाढवली आहे. आगामी काळात मजुरांचे पलायन रोखण्यासाठी दिल्लीच्या विविध भागांत सुमारे साडेतीनशे शाळा आणि १०० समाज मंदिरे वापरात आणण्याचा सरकारचा मनोदय आहे.

निवारागृहांमध्ये डॉक्टर नियमितपणे येऊन तपासणी करत असल्याचे दिल्ली सरकारने सांगितले. मात्र निवारागृहांमध्ये जाण्यासाठी हजारो परप्रांतीय मजूर घाबरत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी आपल्याला कोरोनाची लागण होईल, अशी भीती त्यांच्या मनात कायम आहे. ही भीती तसेच भविष्यात दिल्लीमध्ये रोजीरोटी मिळेल का, ही अनिश्चितता घालविण्यास यंत्रणा अद्याप पुरेशी यशस्वी ठरत नसल्याचे चित्र आहे.

आंध्रात घोड्यावरून पोलिसाचे प्रबोधन
संसर्गजन्य असलेल्या घातक कोरोनाव्हायरसबद्दल जनजागृतीसाठी आंध्र प्रदेश सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करीत आहेत. यात पोलिसही मागे नाहीत. 
कर्नूल जिल्ह्यातील पियापल्ली शहरातील पोलिस उपनिरीक्षक मारुती संकर हे चक्क घोड्यावर बसून लोकांमध्ये या आजाराबद्दल माहिती देताना मंगळवारी दिसले. 

केरळमध्ये कोरोनाचा दुसरा बळी 
केरळमध्ये सोमवारी (ता. ३०) रात्री कोरोनाच्या दुसऱ्या बळीची नोंद झाली. अब्दुल अझीझ (वय 69) असे त्यांचे नाव असून तो पोथेनकोद येथे राहायचे. त्यांना १३ मार्च रोजी कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे आढळून आली. अर्धांगवायूच्या झटक्‍यामुळे त्यांना उच्च रक्तदाब आणि थायरॉईडचा त्रास होता. कोरोनाची त्यांची पहिली चाचणी ‘निगेटिव्ह’ आली होती.

रेल्वेत विलगीकरण कक्ष
रेल्वेने उपचारांसाठी विलगीकरण कक्ष तयार करण्याचे काम सुरू आहे. कपूरथळा येथे तयार झालेले पाच हजार कोच म्हणजेच हजार रुग्णांच्या उपचारांची सोय असलेले डबे रुळांवर आले आहेत. आवश्यकता भासल्यास ९० हजार कोच म्हणजेच तीन लाख २० हजार रुग्णांवर उपचारांची क्षमता रेल्वे प्रशासन विकसित करत आहे असे सांगण्यात आले. 

आरक्षण येत्या १५ पासून सुरू
दुसरीकडे सध्याच्या परिस्थितीमुळे १४ एप्रिलपर्यंत बंद असलेली प्रवासी सेवा १५ एप्रिलपासून सुरू करण्याचे सूतोवाचही रेल्वे मंत्रालयाने केले आहे. त्यानुसार १५ एप्रिलपासून गाड्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरू होईल, असे आज सांगण्यात आले.

ओडिशाच्या सीमा बंद
स्मृती सागरिका कानुनगो

भुवनेश्‍वर - स्थलांतरित मजुरांसह अन्य नागरिकांचा लोंढा रोखण्यासाठी ओडिशा सरकारने शेजारील राज्यांच्या सीमा बंद केल्या आहेत.

कोरोनाव्हायरसचा प्रसार झालेल्या तेलंगण, पश्‍चिम बंगाल, छत्तीसगड आणि अगदी महाराष्ट्र, केरळसारख्या राज्यांमधून ओडिशात मूळ गावी येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या लोंढ्याबरोबर कोरोनाच्या विषाणूंचे वहन होण्याची भीती असल्याने राज्य प्रशासनासाठी हे स्थलांतर डोकेदुखी ठरले आहे. या राज्यांमधून ओडिशात आलेले लोक एकांतवासाचा नियम पाळत नसून त्यांच्या गावातील लोकांमध्ये मिसळत आहेत, अशी चिंता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

ओडिशात बाधितांची आत्तापर्यंतची संख्या तीन आहे. या राज्याच्या शेजारी आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि प. बंगाल आहे. गेल्या आठवड्यापासून सार्वजनिक वाहतूक बंद केली असली तरी खासगी भाडोत्री वाहनांतून मोठ्या प्रमाणावर लोक ओडिशात येत असल्याचे चित्र दिसत आहे. मूळ गावाकडे परतण्यासाठी अनेक जण मैलोंनमैल चालत ओडिशाला पोचत आहेत. अशा मजुरांची संख्या सुमारे आठ हजार २०० आहे. 

ओडिशातील स्थिती

  • अन्य राज्यांमधून ८,२०० स्थलांतरित गावी पोचले
  • २,२६१ ग्रामपंचायतींमधील १.२५ लाख व ८० स्थानिक स्वराज्य संस्थांमधील १९ हजार ८८६ गरीब लोकांना राज्यामार्फत अन्नपुरवठा
  • गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक,  तेलंगणमध्ये राज्यातील १.२ स्थलांतरित मजूर अडकले
  • ओडिशात राहणाऱ्या अन्य राज्यांमधील २० हजार मजुरांसाठी निवारा छावण्या
  • भटक्या जनावरांना अन्न मिळत नसल्याने सरकारकडून ५४ लाखांची तरतूद

सहा बाधितांचा तेलंगणमध्ये मृत्यू
आर. एच. विद्या

हैदराबाद - काही दिवसांत राज्य कोरोनामुक्त होईल अशी, घोषणा झालेल्या तेलंगणमध्ये या विषाणूंची लागण झालेल्या सहा जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने सोमवारी (ता. ३०) रात्री याची माहिती जाहीर केली. 

दिल्लीतील निजामुद्दिन येथे झालेल्या तबलीगे मरकसच्या कार्यक्रमाला तेलंगणमधून एक हजार लोक गेले होते. त्यातील सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने घेतला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची चाचणी घेऊन उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

पत्रकाराचा मृत्यू
तबलीगे मरकसच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तेलंगणमधील ज्या सहा जणांचा कोरानामुळे मृत्यू झाला, त्यात हैदराबादमधील उर्दू पत्रकार आलम यांचा समावेश आहे. त्यांच्या नऊ नातेवाइकांना रुग्णालयात दाखल केले आहे.

दहा वर्षांच्या मुलाला काश्‍मीरमध्ये बाधा
जावेद मात्झी

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमध्ये कोरोना बाधित नवे सहा रुग्ण मंगळवारी आढळले. यात दहा वर्षांच्या एका मुलाचा समावेश आहे. ज्या व्यक्तीच्या संपर्कात तो आला होता, त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. 

‘‘राज्यात कोरानाव्हायरसची लागण झालेल्यांची एकूण संख्या आता ५५ पर्यंत वाढली आहे. नवे रुग्ण काश्‍मीर विभागातील आहेत. आधी ज्यांना विषाणूंची लागण झाली होती, त्यांच्या संपर्कात ते आले होते. अशा प्रकारे संपर्कात आलेल्यांचा शोध जम्मू आणि काश्‍मीर विभागात घेण्यात येत आहे. त्यासाठी सहकार्य करावे,’’ असे आवाहन राज्य सरकारचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी ट्विटद्वारे केले आहे. 

बाधितांचा शोध घेण्याची मोहीम वेगाने सुरू आहे.  जम्मू, श्रीनगर, पुलवामा, सोपियाँ, राजौरी आदी ठिकाणी काल बाधित आढळले. अशी सर्व ठिकाणे बंद केली आहेत. 
- रोहित कंसल, प्रवक्ता, जम्मू-काश्‍मीर

तेलंगणमध्ये वेतनावर कुऱ्हाड
हैदराबाद - कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनच्या स्थितीमुळे तेलंगण सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या महसूलवर परिणाम झाल्याने वेतन कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव सरकारने या महिन्यापासून सर्व सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या वेतनात ७५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हैदराबाद येथे एका उच्चस्तरिय बैठकीनंतर वेतन कपातीचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने नोकरदारांबरोबरच निवृत्तीवेतनधारक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात ५० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकाऱ्यांना एकूण वेतनाच्या ४० टक्केच वेतन मिळणार आहे. राज्यातील वर्ग दोन श्रेणीतील अधिकारी यांना निम्मेच वेतन दिले जाणार आहे. याशिवाय चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे दहा वेतन टक्के कपात होईल. त्यांना ९० टक्के वेतन दिले जाणार आहे. त्याचवेळी यंदा ५० टक्केच पेन्शन मिळणार आहे. सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात ७५ टक्के वेतनात कपात करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com