esakal | बूस्टर डोस अपरिहार्यच...
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine

बूस्टर डोस अपरिहार्यच...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-डॉ. संग्राम पाटील

तोंडचे पाणी पळवणाऱ्या कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंधासाठी लशीचे घेतलेले डोस अपुरे पडत आहेत. तिसरा किंवा बूस्टर डोस घेऊन त्यापासून अधिक संरक्षण मिळते, असे लक्षात आले आहे. त्याविषयी...

भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात अनेक लोकांना लशींचे दोन डोस घेऊनही कोरोनाचे संक्रमण होताना दिसते आहे. हाच अनुभव इतर देशांतही येतो आहे. अशा परिस्थितीत आज जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांसमोर एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे... कोरोनाच्या प्रतिबंधासाठी तिसरा डोस (बूस्टर) घेण्याची गरज आहे का?... याबाबत जगभरातून काय माहिती पुढे येते हे पाहिले पाहिजे. ब्रिटन आणि इस्राईलमध्ये अठरा वर्षांवरील बहुतांश लोकसंख्या लसीकरण झालेली आहे. अमेरिकेत मात्र अजून लसीकरणाचा आकडा बराच कमी आहे. विशेषतः ज्या राज्यांत लसीकरण कमी आहे, तिथे डेल्टा प्रकारामुळे कोरोनाचे संक्रमण वाढते आहे आणि लोक आजारी पडताहेत.

ब्रिटनमध्ये तिसरी लाट सध्या ओसरते आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान जेवढे रुग्ण प्रतिदिन पॉझिटिव्ह येत होते, तेवढेच या लाटेतदेखील आले. परंतु दररोज दवाखान्यात दाखल होणारे आणि कोरोनामुळे मृत्यू पावणारे लोक दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी प्रमाणात आहेत. याचाच अर्थ असा की, लसीकरण होऊनही ब्रिटनमध्ये डेल्टाच्या लाटेत लोक संक्रमित झाले आहेत. पण गंभीर आजारी पडणे किंवा मृत्यूचे प्रमाण लसीकरणामुळे खूप कमी झाले आहे.

‘डेल्टा’चा लशींना कमी प्रतिसाद

इस्राईलचे लसीकरण १२ वर्षांवरील ७८ टक्के लोकसंख्येसाठी पूर्ण झाले आहे. धोक्यात असलेल्यांचे जवळ जवळ सर्वांचे लसीकरण झाले आहे. इस्राईलमध्ये जुलैपासून डेल्टा व्हेरियंटमुळे चौथी लाट सुरू झाली आहे आणि ती वाढत जाऊन आज ८-९ हजार केसेसची दररोज नोंद होते आहे. दिवसाला २०-२५ लोक कोरोनाने जीव गमावत आहेत. यातून हे लक्षात येते की, विषाणूचा डेल्टा प्रकार उपलब्ध लशींना कमी प्रतिसाद देतो आहे. विशेषतः लसीकरण झाल्यावर ७-८ महिन्यांनंतर लशींचा प्रभाव कमी होताना दिसतो आहे. याला डेल्टा प्रकार जबाबदार असू शकतो. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे दुसऱ्या डोसनंतर ७-८ महिन्यांनंतर प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता पुढे येते आहे.

‘नेचर’ या संशोधन पत्रिकेत प्रकाशित अहवालदेखील असे दर्शवताहेत की, कोरोनाच्या विरोधात संरक्षण सहा महिन्यानंतर ९४ टक्क्यांवरून ८७ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. डेल्टा प्रकाराच्या प्रभावामुळे हे संरक्षण अजूनच कमी होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे अभ्यास इतरही ठिकाणाहून प्रकशित होताहेत. तिसऱ्या डोसच्या बाबतीतही जगात आघाडीवर आहे. ३० जुलैपासून इस्राईलमध्ये ६० वर्षांवरील लोकांना तिसरा डोस देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. त्यानंतर १३ ऑगस्टपासून ५० वयावरील आणि मागच्या आठवड्यात चाळीसवर वयाच्या लोकांना तिसरा डोस देण्याचे काम सुरू झाले आहे. इस्राईलच्या सरकारने याबाबत सुरुवातीची काही माहिती प्रकाशित केली आहे. बूस्टर डोस (तिसरा डोस) घेतलेल्या ६० वर्षांवरील लोकांमध्ये संक्रमण बरेच कमी दिसून येते आणि या गटात मृत्यूदेखील मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे.

बूस्टर डोस अधिक उपयुक्त

सोबतचा आलेख अगदी बोलका आहे. इस्राईलमधील सत्तर वर्षांपलीकडील लोकांमध्ये तिसऱ्या डोसचा परिणाम दर्शविणारा आलेख. लाल रंगातील रेषा तिसरा डोस न मिळालेल्या ७० वर्षे वयावरील लोकांमधील संक्रमण दर्शवतो, तर निळ्या रंगातील रेषा तिसरा डोस घेतलेल्या लोकांबाबतचा आहे. डेल्टाच्या संक्रमणात तिसऱ्या डोसच्या उपयुक्ततेबाबत प्रत्यक्ष लोकांना होणाऱ्या फायद्याबद्दल हा जगातील पहिलाच अहवाल आहे. (आलेखाचा स्रोत प्रा. डोरोन गाझीट, जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठातील प्रोफेसर यांच्या ट्विटर हॅन्डलवरून)

भारतातही कोरोना लशींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर होणाऱ्या कोरोना संक्रमणातून गंभीर कोरोना किंवा मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही कमी असल्याचे दिसून येते आहे. दवाखान्यात कोरोनामुळे भरती होणारे किंवा मृत्यू होणाऱ्यांत लस न घेतलेल्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळे शास्त्रीय अहवाल, दोन डोस घेतल्यावर भारतात दिसून येणारे संक्रमण, इस्राईलमधील तिसऱ्या डोसचा होणारा फायदा आणि दोन डोस नंतरदेखील इंग्लंडमध्ये वाढलेला कोरोना यावरून असे म्हणता येईल की, भारतात येत्या काही महिन्यांत कोरोनाचा धोका असाच सुरू राहिल्यास आपल्यालाही तिसरा (बूस्टर) डोस द्यायची गरज पडेल, असे दिसते आहे.

(लेखक ब्रिटनमधील नॉर्थ वेल्स येथील भूल आणि अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करणारे तज्ज्ञ आहेत.)

loading image
go to top