जनता कर्फ्यूला एक वर्ष पूर्ण; कोरोनाचा कहर सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india corona janata curfew

देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला तेव्हा 66 रुग्ण होते. त्यानंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्ण 16 सप्टेंबर 2020 रोजी सापडले होते. दिवसभरात 97 हजार 894 इतका उच्चांक रुग्णसंख्येनं गाठला होता.

जनता कर्फ्यूला एक वर्ष पूर्ण; कोरोनाचा कहर सुरूच

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाला थोपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी २२ मार्चला जनता कर्फ्युचे आवाहन केले होते, या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. जगभरात कोरोना विषाणूचे नाव सर्वतोमुखी होण्यास सुरुवात होऊन त्याचा प्रभावही वाढत असल्याचे वृत्तांमधून समजत असल्याने, भारतात पंतप्रधानांच्या या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता.भारतात कोरोना संसर्ग पुन्हा डोके वर काढत असताना आणि अनेक शहरांमध्ये पुन्हा जनता कर्फ्यु, संचारबंदी लागू होत असताना पहिल्या जनता कर्फ्युवेळी होता तसा उत्साह आता काहीसा मावळल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने लगेचच २४ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन जारी करत भारताने कोरोनाविरोधात युद्ध पुकारले होते. वेळेवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे भारतात कोरोना संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवता आले, असे अनेक अहवालांमधून सांगण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या वर्षी ११ मार्चला कोरोना ही जागतिक साथ असल्याचे जाहीर केले. भारतात ३० जानेवारीलाच केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर गेल्या वर्षभरात भारतात कोरोनाबाधितांची संख्या एक कोटी १६ लाखांच्या जवळ जाऊन पोहोचली असून दीड लाखांहून अधिक जणांचा या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याने, आतापर्यंत कोरोना चाचण्या आणि आरोग्य सेवकांच्या, कोरोना योद्ध्यांच्या अथक प्रयत्नांमुळे नियंत्रणा आलेली ही साथ पुन्हा जोर धरू नये आणि पुन्हा देशभरात जनता कर्फ्यु लावण्याची वेळ येऊ नये, यासाठी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारे वारंवार करत आहेत. 

हे वाचा - भारताच्या लस डिप्लोमसीला झटका! लस पुरवठा करण्यास सीरमचा नकार

देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला तेव्हा 66 रुग्ण होते. त्यानंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्ण 16 सप्टेंबर 2020 रोजी सापडले होते. दिवसभरात 97 हजार 894 इतका उच्चांक रुग्णसंख्येनं गाठला होता. जनता कर्फ्यूला वर्ष होत असताना 21 मार्चला देशात दिवसभरात नवीन 43 हजार 846 रुग्ण सापडले आहेत.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

रविवारी भारतात कोरोनाचे 47 हजार रुग्ण सापडले असून गेल्या 130 दिवसांमध्ये एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 213 जणांचा मृत्यू झाला आहे. 13 जानेवारीनंतर पहिल्यांदा हा आकडा 200 च्या वर पोहोचला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रात जवळपास 1 लाख 65 हजार इतके रुग्ण आढळले आहेत. त्या तुलनेत देशात 2 लाख 60 हजार नवीन रुग्ण सापडले. 

Web Title: Coronavirus Janata Curfew 1 Year India Covid 19 Situation Remain Bad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top