लॉकडाउनचं पुढं काय? पंतप्रधान मोदी घेणार ही महत्त्वाची बैठक 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 10 मे 2020

संसर्गाविरोधातील लढाईची पुढील  रणनीती ठरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी  उद्या (ता. ११) रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. 

नवी दिल्ली  : देशातील तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन सतरा मे रोजी संपुष्टात येणार असून या संसर्गाविरोधातील लढाईची पुढील रणनीती ठरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. ११) रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. एकीकडे कोरोनाचे वाढते थैमान रोखण्याचे आणि दुसरीकडे तब्बल ४५ दिवसांच्या लॉकडाउननंतर अर्थव्यवस्था सावरण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे असेल. कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता लक्षात घेऊन सरकारने याआधीच देशभरातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी केली आहे. झोननिहाय आर्थिक कामकाज सुरू करण्यासाठी सवलती देखील देण्यात आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाचवी बैठक 
देशातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन केंद्र आणि राज्यांमध्ये अधिक समन्वय राहावा या अनुषंगाने उद्या (ता.११) रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बैठकीत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे आहेत. उद्या दुपारी तीनला ही बैठक होईल. कोरोना संसर्गाच्या काळातील ही पाचवी बैठक असेल. 
 
मुख्य सचिवांशी चर्चा 
मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आज सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या सर्व मुख्य सचिवांनी राज्यातील आर्थिक चक्र गतिमान करण्यासाठीच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे केंद्राचे लक्ष वेधले. आपापल्या राज्यांमधील कोरोना मुकाबल्याची माहितीही मुख्य सचिवांनी केंद्राला दिली. 

कोरोनाग्रस्तांवर उपचार करून घरी परतली नर्स; पतीने केले अशाप्रकारे स्वागत...

सहकार्याचे आवाहन 
मंत्रिमंडळ सचिवांनी सांगितले, की ‘‘ डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णालये, कामाच्या ठिकाणी जाताना कोणतेही अडथळे येणार नाही याची राज्यांनी दक्षता घ्यावी. देशभरात साडेतीन लाख स्थलांतरित मजूर, कामगारांना आपल्या घरी सोडण्यासाठी रेल्वेने 350 श्रमिक स्पेशल गाड्या सोडल्या आहेत. रेल्वेला आणखी गाड्या सोडता याव्यात यासाठी राज्यांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. वंदे भारत मोहिमेअंतर्गत परदेशातून परत येणाऱ्या नागरिकांची योग्य काळजी घ्यावी.’’ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘सीबीएसई’कडून शाळांना परवानगी 
गृहमंत्रालयाने सीबीएसई (केंद्रीय परीक्षा नियंत्रण मंडळ) बोर्ड परीक्षांसाठी उत्तर पुस्तिका तपासणी व मूल्यांकनासाठी देशभरात 3000 शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. यामुळे दीड कोटी उत्तर पुस्तिकांचे वेगाने मूल्यांकन होईल. याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे गृह खात्याला विचारणा करण्यात आली होती. 4 मे जारी करण्यात आलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंटेनमेन्ट झोन वगळता रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये सर्व सरकारी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. साहजिकच या झोनमध्ये असलेली सीबीएसईची सोळा विभागीय कार्यालये देखील सुरू झाली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lock down pm modi will have meeting with chief ministers