राज्यासह देशभर आजपासून लसीकरण; पंतप्रधान मोदींच्या हस्ते आजपासून प्रारंभ 

राज्यासह देशभर आजपासून लसीकरण; पंतप्रधान मोदींच्या हस्ते आजपासून प्रारंभ 

नवी दिल्ली - अवघा देश ज्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होता ती घटिका समीप आली आहे. कोरोना महामारीवरील देशव्यापी लसीकरणास आजपासून (ता.१६) देशातील १६ राज्यांत प्रारंभ होईल. जगातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असेल असे आरोग्यमंत्री  डॉ. हर्षवर्धन यांनी काल सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडेदहाला या मोहिमेचे उद्‌घाटन करतील. पहिल्या टप्प्यात दिल्ली व महाराष्ट्रासह १६ राज्यांतील लाखो डॉक्‍टर व आरोग्य सेवकांना लसीकरण करण्यात येईल. 

असे होईल लसीकरण 
केंद्रीय अप्पर आरोग्य सचिव मनोहर अगनानी यांनी राज्य सरकारांना पत्र लिहून लसीकरणाच्या मोहिमेदरम्यान घ्यावयाच्या सावधगिरीच्या उपाययोजनांची आठवण करून दिली आहे. पहिल्या टप्प्यात एका व्यक्तीस १४ दिवसांच्या अंतराने दोनदा लसीकरण करण्यात येईल. पहिल्यांदा डोस दिल्यावर काही जणांना त्याचे दुष्परिणाम जाणवले तर संबंधितांची सर्व माहिती त्वरित केंद्राकडे कळवावी असेही निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत. 

ही काळजी घ्यावी लागणार 
कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्‍सिन या दोन लशींचा लसीकरणासाठी वापर करण्यात येईल. जी लस सुरवातीला देण्यात येईल तीच लस त्या व्यक्तीस दुसऱ्याही टप्प्यात द्यावी, गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना तसेच १८ वर्षांच्या आतील मुलांना सुरवातीला लसीकरण करू नये असेही सांगण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनाची लक्षणे असलेल्यांना रुग्णालयांतून घरी पाठविल्यावर ४ ते ८ आठवड्यांनी लसीकरण करावे असेही केंद्राच्या निर्देशांत म्हटले आहे. 

लोकांचा विश्‍वास 
एडल्मन ट्रस्ट बारोमीटर या संस्थेतर्फे जगातील २८ कोरोनाग्रस्त देशांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ८० टक्के भारतीयांनी कोरोनावरील लस घेण्याची तयारी दाखविल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. ते म्हणाले की, सर्वात जास्त भारतीयांनी या लशीवर विश्‍वास दर्शविला आहे. ब्रिटनमधील ६६ टक्के, जर्मनीत ६२, अमेरिकेत ५९ तर रशियातील ४० टक्के नागरिकांनी लस घेण्याची तयारी दाखविली आहे. 

आयोगाचा डेटा दिमतीला 
लसीकरणासाठी मतदार याद्यांचा वापर करण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे मात्र लसीकरण पूर्ण झाल्यावर संबंधित आरोग्य अधिकाऱ्याने तो डेटा त्वरित डिलीट करावा असे बंधन आयोगाकडून घालण्यात आले आहे. लस घेतल्यावर काही जणांना इंजेक्‍शन घेतलेल्या ठिकाणी हलकी वेदना होणे, डोके दुखणे व उलटी होण्याचा व थकव्याचा त्रास जाणवू शकतो असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. 

मोहिमेची व्याप्ती 

३००६ - लसीकरण केंद्रे 

१०० जणांना - पहिल्यांदा लसीकरण 

२०० ते २९५ रुपये  - सवलतीमधील लशींची किंमत 

१ कोटी ६५ लाख रुपये - किमतीच्या लशी राज्यांकडे रवाना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com