
ईशान्येतील भ्रष्टाचार संपविला - अमित शहा
नामसाई : भाजपने ईशान्येतील भ्रष्टाचाराची संस्कृती संपविली. त्यामुळे, आता ईशान्येत विकासाचा निधी शेवटच्या व्यक्तींपर्यंत पोचत आहे. काँग्रेसच्या राजवटीत बहुतांश निधी मध्यस्थांनीच पळविला, असा टोला अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लगावला. अरुणाचलमधील विविध विकासकामांचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते झाले. त्यानंतर नामसाईत सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
काँग्रेसच्या गेल्या ५० वर्षांच्या राजवटीत ईशान्य भारताकडे दुर्लक्ष झाले. नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ईशान्य भारत विकासाच्या घोडदौड करत आहे, असेही ते म्हणाले. मोदींनी ईशान्येसाठी काय केले, या सवालाबद्दलही त्यांनी काँग्रेसला धारेवर धरले.
ते म्हणाले, की आपले डोळे बंदच ठेवले तर या जुन्या पक्षाला कधीही ईशान्येतील विकास दिसणार नाही. त्यामुळे, राहुल गांधी यांनी यांनी चष्म्याच्या इटालियन काचा फेकून भारतीय काचा घालाव्यात व डोळे उघडावेत. त्यानंतरच ईशान्येत मोदींनी कोणता विकास घडविला ते दिसेल. जो करण्यात तुमच्या पक्षाला ५० वर्षे अपयश आले. काँग्रेसच्या राजवटीत विकासकामांसाठीचा निधी मध्यस्थच लांबवत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये एनडीए सत्तेवर आल्यावर भ्रष्टाचाराची संस्कृती संपुष्टात आली. आता, विकासकामांसाठीचा प्रत्येक रुपया अत्यंत पारदर्शकपणे वापरला जात आहे, असेही ते म्हणाले.
पूर्वीच्या सरकारांच्या सदोष धोरणांमुळे ईशान्य भारत दहशतवादाबद्दल ओळखला जात होता. मात्र, केंद्राने बहुतेक दहशतवादी संघटनांशी शांतता करार केल्याने आता ईशान्येत शांतता नांदत आहे. गेल्या आठ वर्षांत ईशान्येतील ९,६०० दहशतवादी शरणागती पत्करत मुख्य प्रवाहात सामील झाले. त्याचप्रमाणे येथील युवकांना बंदूक संस्कृतीत रस उरला नसून ते स्टार्टअपची उभारणी करत आहे. ईशान्येत शांतता व विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आसाम-अरुणाचलमधील सीमावाद मिटणार
आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील अनेक दशकांच्या सीमावादाचाही शहा यांनी उल्लेख केला. यासंदर्भात योग्य ती प्रक्रिया सुरू केल्याबद्दलही त्यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू सीमावाद मिटविण्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करत असून लवकरच हा वाद संपुष्टात येईल, असे ते म्हणाले.
तीनकलमी कार्यक्रम
ईशान्येतील भाषा, बोलीभाषा, पारंपरिक नृत्य, संगीत, खाद्यपदार्थ आदींचे जतनच नव्हे तर त्यांना समृद्ध करणे.
सर्व वाद मिटवून शांत, दहशतवादमुक्त, शस्त्रमुक्त ईशान्य भारताची निर्मिती करणे. जगातील युवकांशी स्पर्धा करण्यासाठी ईशान्येतील युवकांना सक्षम बनविणे.
ईशान्येतील आठ राज्यांना देशातील सर्वाधिक विकसित राज्ये बनविणे.
Web Title: Corruption In The Northeast Is Over Amit Shah Arunachal Pradesh Visit Criticize Congress
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..