Bihar election 2020 : बिहार विधानसभेची आज कडक बंदोबस्तात मतमोजणी 

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 10 November 2020

विधानसभेच्या २४३ मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी झाली असून ३८ जिल्ह्यात ५५ ठिकाणी ही प्रक्रिया होत आहे. याबाबत सोमवारी निवडणूक आयोगाने व्हिसीद्वारे सर्वकाही ठिक आहे की नाही, हे जाणून घेतले. 

पाटणा - देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभेच्या निकालात नीतिशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार की तेजस्वी यांचे तेज झळकणार, हे आता काही तासांनी कळणार आहे. विधानसभेच्या २४३ मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी झाली असून ३८ जिल्ह्यात ५५ ठिकाणी ही प्रक्रिया होत आहे. याबाबत सोमवारी निवडणूक आयोगाने व्हिसीद्वारे सर्वकाही ठिक आहे की नाही, हे जाणून घेतले. 

बिहार राज्याच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. शनिवारी मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला आणि आज मतमोजणीला सुरवात होत आहे. दुसरीकडे एनडीए आणि महाआघाडीने सरकार स्थापनेचे दावे केले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी संजय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गामुळे खबरदारीचे उपाय म्हणून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ७३ हजार अधिक मतदान केंद्र स्थापन केले होते. त्यामुळे निकालाला विलंब लागू शकतो. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. प्रारंभी पोस्टल बॅलेटची मोजणी होईल आणि त्यानंतर साडे आठ वाजता इव्हीएम मतांची मोजणी सुरु होईल. या प्रक्रियेनंतर निकालाचे कल हाती येण्यास ४५ मिनिटे लागू शकतात. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्रिस्तरीय सुरक्षा तैनात 
राज्यातील सर्व मतदानमोजणी केंद्राच्या आसपास अत्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्राच्या मार्गावर बॅरिकेडस लावण्यात आले असून अर्धा किलोमीटर मतमोजणी केंद्रापासून अलीकडेच नागरिकांना रोखले जाणार आहे. पासधारकानाच मतदान केंद्राकडे सोडले जाणार आहे. केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आणि परिसरात बिहार पोलिस आणि राखीव दलाचे जवान तैनात केले जात आहेत. स्ट्रॉंग रुमपासून ते मतमोजणी केंद्रापर्यंतच्या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी निमलष्करी दलाकडे दिली आहे. याशिवाय निकालानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सीआरपीएफच्या ५९ तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे. एका तुकडीत ९५ ते ११० पर्यंत जवानांचा समावेश असतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाटण्यात सर्वाधिक मतमोजणी केंद्र 
चंपारण, बेगूसराय आणि गया येथे तीन-तीन मतमोजणी केंद्र स्थापन केले आहेत. नालंदा, नवादा, बांका, भागलपूर, दरभंगा, गोपालगंज, सहरसा, पूर्णिया येथे दोन दोन मतमोजणी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. ५५ मतमोजणी केंद्रावर ४१४ हॉल तयार केले आहेत. प्रत्येक हॉलमध्ये किमान चौदा टेबल असतील. इव्हीएमची संख्या जादा असल्याने २४३ जागांची मतमोजणी ४१४ हॉलमध्ये केली जाणार आहे. पाटण्यात सर्वाधिक ३० हॉल आहेत. त्यानंतर सारण, समस्तीपूर, गया येथे २०-२० हॉल आहेत. सर्वात कमी संख्या शिवहर येथे असून तेथे एकच हॉल आहे. त्यानंतर लखीसराय (दोन) आणि शेखपूरा (तीन) यांचा क्रमांक लागतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Counting of votes in Bihar Assembly today under tight security