Corona Updates: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 66 लाखांच्या वर; 24 तासांत 74 हजार 442 नवीन रुग्ण

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 5 October 2020

देशात मागील 2-3 महिन्यांपासून कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढल्याचं दिसलं आहे. सध्या देशात प्रतिदिन 10 लाख लोकसंख्येमागे 140 कोरोना चाचण्या होत आहेत.

नवी दिल्ली: भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 66 लाखांच्या वर गेला आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाने (COVID19) 903 रुग्णांचा मृत्यू झाला असून 74 हजार 442 नवीन रुग्ण आढळले आहेत.

देशात आतापर्यंत 66 लाख 23 हजार 816 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 55 लाख 86 हजार 704 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे 9 लाख 34 हजार 427 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत तर 1 लाख 2 हजार 685 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात मागील 2-3 महिन्यांपासून कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढल्याचं दिसलं आहे. सध्या देशात प्रतिदिन 10 लाख लोकसंख्येमागे 140 कोरोना चाचण्या होत आहेत. ही चाचण्यांची संख्या जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) सांगितलेल्या प्रतिदिन चाचण्यांपेक्षा 6 पटीने जास्त आहे. विषेश म्हणजे काही राज्यात देशातील सरासरीपेक्षा जास्त कोरोना चाचण्या होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे.  

महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. मागील 24 तासांत राज्यात कोरोनाच्या 13 हजार 702 रुग्णांचं निदान झालं असून 326 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  राज्यातील एकून कोरोना रुग्णांचा आकडा 14 लाख 43 हजार 409 वर गेला असून दिलासादायक बाब म्हणजे त्यातील 11 लाख 49 हजार 603 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनाने 38 हजार 84 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 2 लाख 55 हजार 281 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.  

हे वाचा - ट्र्म्पना दिलं जातंय 'स्पेशल औषध'; अजुन इतरांसाठी नाही उपलब्ध

मागील 24 तासांत देशात 9 लाख 89 हजार 860 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशातील कोरोना चाचण्यांची संख्या 7 कोटी 99 लाख 82 हजार 394 झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 patients in india cross 66 lakh