esakal | कोरोना लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर काय करायला हवं?

बोलून बातमी शोधा

कोरोना लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर काय करायला हवं?}

घाबरुन कोणतेही पाऊल उचलू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच....

कोरोना लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर काय करायला हवं?
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

देशभरात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास दहा लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, लस घेतलेले काही लोक साईड इफेक्‍ट होत असल्याची तक्रार करत आहेत. अशात लसीकरणाबाबत काही महत्वाच्या गोष्टी माहित असायला हव्यात. जर तुम्ही तरुण आणि निरोगी (Young & Healthy)  असाल तर कोरोना लशीचा तुमच्यावर साईड इफेक्‍ट होण्याची शक्यता कमीच आहे.  ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असेल आणि मधुमेह(Diabetes), उच्च रक्तदाबसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असाल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने (Doctors Advice) किंवा डॉक्टरांच्या उपस्थितीतच लशीचा डोस घ्या.

अॅलर्जीनं ग्रस्त असाल तर डॉक्टरांच्या सल्ला घेतल्यानंतर किंवा परवानगीनंतरच कोरोनाची लस टोचवा. आरोग्य मंत्रालयानं कोरोना लस घेण्यासंदर्भात काही सुचनाही प्रसारित केल्या आहेत. यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेय की, जर तुमच्यावर इतर कोणत्या आजाराचे उपचार सुरु आहेत किंवा एखाद्या पदार्थ अथवा इंजेक्शन थेरपीची अॅलर्जी असेल तर लस घेण्याचं टाळा. 

आरोग्य तज्ज्ञांनुसार, कोरोनाची लस घेण्यापूर्वी पौष्टिक आणि चांगलं जेवण करायला हवं. सोबतच भरपूर पाणी आणि फळांचा रस प्यावा. तसेच तुमच्यावर उपचार सुरु असतील किंवा तुम्ही औषधं खात असाल तर लस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरु नका.  लस घेण्यापूर्वी झोप व्यवस्थित झालेली असावी. जर लस घेण्याची तुमची वेळ आधीच ठरलेली असेल तर २४ तास आधी तूम्ही झोप पूर्ण करा. तसेच काही दिवस व्यायमही करा. जेणेकरुन कोरोनाची लस घेतल्यानंतर तुम्हाला कोणतेही साइड इफेक्ट होणार नाहीत.. शिवाय तुमचं शरीर तुम्हाला साथ देईल. पोटात जळजळ होणारं एखादं औषधं अथवा गोळ्या तुम्ही घेत असाल तर लस घेण्यापूर्वी ते खाण टाळा. 

कोरोनाबाधित रुग्णांनी काय करावं? हा प्रश्न प्रत्येकालाच भेडसावत असेल. जर एखादा व्यक्ती कोरोनाबाधित झाला असेल आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी प्लाज्मा थेरपी किंवा मोनोक्लोनल एन्टीबॉडीज देण्यात आली असेल तर अशा रुग्णांनी कोरोनाची लस घेऊच नये. कोरोनाची लस घेतल्यानंतर आपल्या आरोग्याकडे आणि लक्षणांवर नजर ठेवा. यासंदर्भात डॉक्टरांच्या अथवा आरोग्य तज्ज्ञांच्या संपर्कात राहा. आपल्यात होणाऱ्या चांगल्या-खराब बदलांची माहिती त्यांना द्या. गंभीर साइड इफेक्ट किंवा त्याची लक्षणे समोर आल्यानंतर घरात त्यावर कोणतेही उपचार करु नका. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्यावर उपचार करा. एक गोष्ट लक्षात ठेवा साइड इफेक्ट होणं कोणतेही मोठी किंवा गंभीर बाब नाही. त्यामुळे घाबरुन कोणतेही पाऊल उचलू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा. 

कोरोना लस घेतल्यानंतर अॅलर्जिकल रिअॅक्शन, अंग दुखी, ताप किंवा अशक्तपणासारखी लक्षणं सर्वसामान्यपणे प्रत्येकांमध्ये दिसून  आली आहेत. त्यामुळे लगेच घाबरुन जायची गरज नाही. तुमच्या शरिरातील प्रतिकारक शक्ती लसीविरोधात रिअॅक्ट होत असल्यामुळे थोडेफार बदल दिसून येत आहेत. कोरोना लशीचे दोन डोस घेतल्यानंतरच तुमचं लसीकरण पूर्ण झाल्याचं मानलं जातेय. जर दुसरा डोस घेण्यापूर्वी तुम्हाला कोरोनाची लागण झाल्यास आश्चर्यचकित होऊ नका. कोरोनाची लस घेतल्यानंतरही तुम्हाला कोरोना होऊ शकतो, हे विसरता कामा नये. आरोग्य तज्ज्ञांच्या मतांनुसार, कोरोना लस घेतल्यानंतरही सोशल डिस्टेंन्सिंग, मास्क, हात धुणे यासारख्या सर्व बाबींचं पालन करावं.