CoWIN पोर्टल आता हिंदीसह 14 प्रादेशिक भाषांमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cowin

CoWIN पोर्टल आता हिंदीसह 14 प्रादेशिक भाषांमध्ये

नवी दिल्ली- देशात लसीकरण सुरु झाल्यापासून कोविन CoWIN ऍपला महत्व प्राप्त झालं आहे. लसीकरणाची नोंदणी कोविन ऍप किंवा वेबसाईटवर जाऊन नागरिकांना करता येत आहे. याआधी कोविन ऍप फक्त इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध होतं, पण ते आता इतर भाषांमध्येही उपलब्ध होणार आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी यासंदर्भात घोषणा केली असून, कोविन ऍप हिंदीसह अन्य १४ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. पुढील आठवड्यापासून ही सुविधा सुरु होईल. हर्षवर्धन यांनी आणखी एक घोषणा केली आहे. नवीन कोरोना व्हॅरिएंट शोधण्यासाठी देशात आणखी १७ प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. (CoWIN portal in Hindi other languages from next week more labs to monitor COVID variants said harshverdhan)

मंत्रालयाने सांगितल्यानुसार, कोविडसंबंधी घेण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. INSACOG नेटवर्कमध्ये आणखी १७ प्रयोगशाळा वाढवण्यात येणार असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं. यामुळे कोरोना व्हॅरिएन्टच्या तपशिलवार अभ्यासास मदत होणार आहे. सध्या INSACOG नेटवर्कमध्ये १० प्रयोगशाळा असून त्या देशातील वेगवेगळ्या भागात आहेत.

हर्षवर्धन यांनी यावेळी देशातील कोरोना स्थितीवर भाष्य केलं. देशातील कोरोना रुग्णसंख्या काही दिवसांपासून कमी होत आहे. २६ दिवसांनतर कोरोना रुग्णसंख्या ३ लाखांच्या खाली आली आहे. तसेच गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णसंख्येत तब्बल १ लाखांची घट पाहायला मिळाली असल्याचं हर्षवर्धन म्हणाले. स्वदेशी कोविड औषध लॉन्च केल्याप्रकरणी हर्षवर्धन यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. कोरोनाविरोधातील लढ्याच औषध महत्त्वाची भूमिका बजावेल, असं ते म्हणाले.

भारतात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यात आता दिलासा देणारी गोष्ट म्हणजे कोरोनावर डीआरडीओने (DRDO developed 2 Dg) 2DG नावाचं औषध तयार केलं आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी 2DG च्या 10 हजार डोसची पहिली बॅच लाँच केली आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेसनं 2DG औषधाची निर्मिती केली आहे. यामध्ये हैदराबादमधील डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीच्या संशोधकांची महत्त्वाची भू्मिका आहे. DRL कडून सर्वसामान्यांसाठी हे औषध तयार करण्यात आलं आहे. पावडरच्या स्वरुपात हे औषध उपलब्ध असणार आहे.

टॅग्स :Cowincowin portal