esakal | रेड झोनमधील दुकानांसमोरही मद्यपींची गर्दी; कोठे काय ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

नवी दिल्ली : मद्यविक्रीच्या दुकानासमोरील रांग

‘लॉकडाउन-३’मध्ये अनेक राज्यांनी केंद्राच्या सूचना पाळून अनेक निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी आज रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसली.  यामुळे देशभरात अनेक ठिकाणी मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या. अतिउत्साही लोकांनी तर रेड झोनमधील दुकानांसमोरही गर्दी केली होती.

रेड झोनमधील दुकानांसमोरही मद्यपींची गर्दी; कोठे काय ते वाचा

sakal_logo
By
पीटीआय

बंगळूर/नवी दिल्ली - ‘लॉकडाउन-३’मध्ये अनेक राज्यांनी केंद्राच्या सूचना पाळून अनेक निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी आज रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसली. यामुळे देशभरात अनेक ठिकाणी मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या. अतिउत्साही लोकांनी तर रेड झोनमधील दुकानांसमोरही गर्दी केली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्राच्या सूचनेनुसार ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योग, बांधकाम प्रकल्प, सर्वसाधारण वस्तू विक्रीची दुकाने, कुरिअर, बँका, रस्ते वाहतूक, मालवाहतूक सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही निर्बंधांसह मद्य विक्री करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. लोकांची झुंबड उडाल्याने पोलिसांना त्यांना पांगविण्यासाठी लाठीमारही करावा लागला. 

दरम्यान, सोमवारी दिल्लीमध्ये दारू विक्री सुरू झाल्यानंतर दारूच्या दुकानांसमोर लागलेल्या मोठ्या रांगांमुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने नाराज झालेल्या अरविंद केजरिवाल यांनी पुन्हा अशी गर्दी झाली तर त्या भागाला कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात येईल असा इशारा मद्यप्रेमींना दिला. नागरिकांना आरोग्याचा विचार करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.

प्रमुख राज्ये आणि परिस्थिती
कर्नाटक -
 राज्यातील बहुतेक भागात सरकारने निर्बंध शिथील केल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली. राज्यात सकाळी सात ते रात्री सात या दरम्यान वाहतूकीस परवानगी देण्यात आली आहे. निर्बंध खुले होताच बंगळूरमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यांवर आल्याने अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅमचे चित्र दिसले. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी स्थलांतरीत मजुरांसाठी मोफत बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिमाचल प्रदेश - सुमारे चाळीस दिवसांनंतर दुकाने उघडली असल्याने नागरिकांनी आज निर्बंध कमी होताच रस्त्यांवर गर्दी केली. सरकारी कार्यालयांमध्येही तीस टक्के उपस्थिती होती. सार्वजनिक वाहतूक मात्र अद्याप बंद आहे. राज्य सरकारने पाच तासांसाठी जवळपास सर्व प्रकारचे व्यवहार करण्यास परवानगी दिली आहे. आज सर्वांत अधिक गर्दी मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर दिसत होती. सर्व ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क लावण हे नियम मात्र लागू आहेत.

आंध्र प्रदेश - राज्यात आजपासून मद्यविक्रीची दुकाने उघडणार असली तरी लोकांनी मद्यप्राशनापासून दूर रहावे त्यावर विशेष कर लावण्यात आला आहे. सकाळी अकरा ते रात्री सातपर्यंत ही दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून खरेदीस येणार्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील.

राजस्थान - राज्यात कंटेनमेंट झोन वगळता सर्व भागांमध्ये मद्य आणि इतर वस्तूंची दुकाने उघडण्यात आली आहेत. सामाजिक अंतराचे नियम पाळून सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जनतेला खरेदीसाठी बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मास्क न घातलेल्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. रस्त्यांवर थुंकण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे.

चंडीगड - मद्यविक्रीस प्रशासनाने परवानगी दिली असली तरी सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू खाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, मद्यविक्रीच्या एका दुकानासमोर एका वेळी पाच हून अधिक जणांना रांगेत उभे राहण्यासही मनाई केली आहे. दोन जणांना किमान सहा फूटांचे अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.