
घुमान : बँडचा सुमधूर सूर...टाळ-मृदंगाचा गजर...संत नामदेवांचा जयघोष...वारी पूर्ण केल्याने सायकलस्वारांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहणारा आनंद...अशा उत्साही वातावरणात मजल दरमजल करीत पंढरपूरहून निघालेली सायकल वारी घुमानमध्ये दाखल झाली. फुलांची उधळण करीत अन् मिठाई खाऊ घालत घुमानवासीयांनी तेवीस दिवसांचा खडतर सायकल प्रवास करून आलेल्या सायकलस्वारांचे स्वागत केले. दिमाखदार मिरवणुकीने घुमान वारीची सांगता झाली.