
Cyclon Mandous High Alert : महाराष्ट्रावर घोंगावतय आस्मानी संकट, हवामान विभागाने दिला हायअलर्ट
Cyclonic Mandous : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे त्याचा बुधवारी संध्याकाळी उशिरा चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाचं नाव 'मंदोस' आहे. याचा फटका प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यांना बसणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
हे चक्रीवादळ ८ तारखेला तामिळनाडूच्या किनारपट्टीवर येण्याची शक्यता असल्याने या भागातील १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात देखील याचा प्रभाव पाहायला मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणमध्ये ८ व ९ तर मध्य महाराष्ट्रात ९ तारखेला हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून तापमानातील वाढही कायम राहण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण-पश्चिम भागामध्ये दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्याची तीव्रता सातत्याने वाढत गेल्याने त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग उत्तर-पश्चिम दिशेने आहे. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या किनारपट्टीजवळ असून या कालावधीत त्याची तीव्रता अधिक असेल.
चक्रीवादळाचा परिणाम ११ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. ९ डिसेंबरला दक्षिणेकडे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील अनेक भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत याचा फटका बसणार आहे.