'वायू' गुजरातला धडकण्याची शक्यता कमी; तरीही प्रभाव जाणवणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 जून 2019

भारतीय हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक देवेंद्र प्रधान यांनी सांगितले, की हे वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकणार नाही. पण, किनाऱ्यापासून जाणार असल्याने याचा प्रभाव जाणविणार आहे. यापूर्वी पोरबंदर आणि दीवदरम्यान आज (ता. 13) हे वादळ धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ विभागांतील सुमारे तीन लाख नागरिकांचे आज स्थलांतर करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली :  गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या 'वायू' चक्रीवादळाचे रूपांतर 'अतितीव्र' झाले असले तरी ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या वादळामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर जोरदार वारे वाहणार असून, पावसाची शक्यता आहे. गुजरातेतील दहा जिल्ह्यांना बुधवारी दक्षतेचा आदेश देण्यात आला.

भारतीय हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक देवेंद्र प्रधान यांनी सांगितले, की हे वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकणार नाही. पण, किनाऱ्यापासून जाणार असल्याने याचा प्रभाव जाणविणार आहे. यापूर्वी पोरबंदर आणि दीवदरम्यान आज (ता. 13) हे वादळ धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ विभागांतील सुमारे तीन लाख नागरिकांचे आज स्थलांतर करण्यात आले आहे. 

कच्छ, मोरबी, जामनगर, जुनागड, देवभूमी-द्वारका, पोरबंदर, राजकोट, अमरेली, भावनगर आणि गीर-सोमनाथ या जिल्ह्यांना चक्रीवदाळाचा फटका बसण्याची शक्‍यता गुजरात प्रशासनाने व्यक्त केली असून, चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. राष्ट्रीय आपत्तीनिवारण दलाची (एनडीआरएफ) 52 पथके गुजरातकडे रवाना करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात 45 जणांचा समावेश असेल. लष्कराच्या दहा तुकड्याही सज्ज ठेवण्यात आल्या असून, नौदलाच्या युद्धनौका आणि विमानांनाही सज्जतेचा आदेश देण्यात आला.

वादळाच्या काळात वाऱ्याचा वेग ताशी 170 किलोमीटरपर्यंत जाण्याच्या शक्‍यतेमुळे गुजरातच्या दहा जिल्ह्यांत सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयातर्फे देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज एका बैठकीत प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. गृहसचिव राजीव गौबा यांनीही उच्चस्तरीय बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. गुजरात प्रशासनाला मदतीसाठी पाणबुडे आणि अन्य पथके तयार ठेवण्यात आली आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी नौदलाच्या मुंबईतील रुग्णालयात वैद्यकीय पथकेही सज्ज आहेत. 

"वायू'ला तोंड देण्यासाठी गुजरातचे प्रशासन सज्ज झाले असून, सौराष्ट्र आणि कच्छच्या सखल भागांतील सुमारे तीन लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सरकारी इमारतींमध्ये या नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बंदरे आणि विमानतळांवरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पश्‍चिम रेल्वेनेही 15 गाड्या उद्या रद्द केल्या असून, 16 गाड्यांच्या मार्गांमध्ये कपात केली आहे. "वायू' सध्या गुजरातच्या दक्षिणेला 280 किलोमीटरवर असून, उद्या ते वेरावळ आणि द्वारकेदरम्यानच्या किनारपट्टीवर धडकण्याचा एक अंदाज आहे. वादळाच्या काळात नागरिकांनी घरीच थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 

प्रशासनाची तयारी 
- सौराष्ट्र, कच्छमधून तीन लाख नागरिकांचे स्थलांतर 
- "एनडीआरएफ'ची 52 पथके गुजरातकडे 
- नौदलाची जहाजे, विमानांना सज्जतेचा आदेश 
- लष्कराच्या दहा तुकड्याही सज्ज 
- खबरदारी म्हणून बंदरे, विमानतळांवरील सेवा बंद 
- पश्‍चिम रेल्वेच्या 15 गाड्या उद्या रद्द


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyclone Vayu unlikely to hit Gujarat