ऑक्सफर्डने थांबवली लशीची ट्रायल; DGCI ने सीरमला पाठवली कारणे दाखवा नोटीस

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

ऑक्सफर्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये युकेतील एकाची तब्येत बिघडल्यानं जगभरात अनेक देशांमध्ये चाचणी थांबवली आहे.

नवी दिल्ली - ऑक्सफर्ड (Oxford covid-19 Vaccine) आणि 'अ‍ॅस्ट्राझेनेका' (AstraZeneca) यांनी तयार केलेल्या कोरोना लशीच्या पुढच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात असतानाच लस दिलेली एक व्यक्ती आजारी पडली आहे. त्यामुळे या लसीची चाचणी थांबवण्यात आली असून 'अ‍ॅस्ट्राझेनेका'ने एक निवेदन जारी केले आहे त्यात म्हटलं आहे की, 'हा नेहमीचा अडथळा आहे.' मात्र, चाचणीत सामील झालेला व्यक्तीच्या आजाराबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही.

दरम्यान, या प्रकारानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. डीजीसीआयने पाठवलेल्या नोटीसीत विचारण्यात आलं आहे की, जोपर्यंत रुग्णाची सुरक्षा निश्चित होत नाही तोपर्यंत तुम्हाला देण्यात आलेली क्लिनिकल ट्रायलची परवानगी निलंबित का करू नये. अमेरिका, युके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत व्हॅक्सिनची ट्रायल थांबवली असताना सीरमने मात्र याची माहिती सेंट्रल लायसनन्सिंग अथॉरिटीला दिली नाही यावरून डीजीसीआयने नाराजी व्यक्त केली असल्याचं वृत्त NDTVने दिलं आहे.

ऑक्सफर्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये युकेतील एकाची तब्येत बिघडल्यानं जगभरात अनेक देशांमध्ये चाचणी थांबवली आहे. डीजीसीआयने म्हटलं की, कारणे दाखवा नोटीसीला त्वरीत उत्तर द्यावं अन्यथा असं मानलं जाईल की तुमच्याकडे काहीच उत्तर नाही आणि त्याविरुद्ध कारवाई केली जाईल. 

हे वाचा - रशियाची कोरोना लशीसंबंधी भारतातील ३ कंपन्यांशी बोलणी; उत्पादन सुरु करणार?

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राझेनका कोविशिल्ड नावाचं कोरोना व्हॅक्सिन तयार करत आहेत. याची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अनेक देशांमध्ये सुरु आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यात भागीदार असून देशात चाचणी घेतली जात आहे. सीरमने युकेमध्ये ट्रायल थांबवल्याचं सांगताना भारतात मात्र सुरू ठेवल्याचं म्हटलं होतं. 

सीरमने असंही म्हटलं की, डीजीसीआयने दिलेल्या आदेशांचे आम्ही पालन करत आहे. आतापर्यंत आम्हाला ट्रायल थांबवण्यासाठी सांगितलेलं नाही. जर डीजीसीआयला लशीच्या सुरक्षिततेवरून काही प्रश्न असतील तर नक्कीच त्यांनी दिलेल्या नियमांचे आणि आदेशाचे पालन करू असंही सीरमने स्पष्ट केलं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dcgi notice to serum institute why not pausing trial of covid 19 vaccine