
‘आप’साठी काम करा : भाजप कार्यकर्त्यांना केजरीवालांचे आवाहन
राजकोट : सध्या गुजरात दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांना आवाहन करताना केजरीवाल यांनी ‘तुम्ही तुमच्या पक्षामध्ये राहून आम आदमी पक्षासाठी (आप) काम करा’ असे म्हटले आहे. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. आमचा पक्ष राज्यामध्ये सत्तेत आल्यानंतर आम्ही जी आश्वासने दिली होती त्याचा लाभ भाजप कार्यकर्त्यांना देखील मिळेल असे केजरीवाल यांनी नमूद केले.
केजरीवाल म्हणाले की, ‘‘ आम्हाला भाजपचे नेते नको आहेत, भाजपने ते स्वतःकडेच ठेवून घ्यावेत. भाजपचे पन्नाप्रमुख, खेड्यातील कार्यकर्ते, बूथ आणि तालुकाप्रमुख हे आमच्या पक्षामध्ये सहभागी होत आहेत. मला त्यांना विचारायचे आहे की इतके दिवस तुम्ही पक्षाची सेवा केली पण त्याबदल्यात तुम्हाला काय मिळाले? भाजप त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि कुटुंबीयांना स्वस्तामध्ये मोफत दर्जेदार शिक्षण, आरोग्यसेवा आणि विद्युत पुरवठा देखील करू शकत नाही पण ‘आप’ तुमच्या कल्याणाची काळजी घेईल. तुम्ही तुमच्यात पक्षात राहा पण काम मात्र आम आदमी पक्षासाठी करा. अनेकांना भाजपने पैसे दिले आहेत, ते पैसे त्यांनी घ्यावेत कारण आम्ही काही पैसे देऊ शकत नाही कारण आमच्याकडे पैसेच नाहीत.
आम्ही मोफत वीज देऊ
राज्यामध्ये जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा आम्ही मोफत वीज पुरवठा करू, तुमच्या घरालाही वीज देऊ, तुम्हाला चोवीस तास वीज पुरविण्यात येईल, तुमच्या मुलांसाठी चांगल्या शाळा बांधू, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एक हजार रुपयांमध्ये आरोग्य उपचार उपलब्ध करून देऊ.’’
भाजपला मतदान करण्यात अर्थ नाही
‘आता भाजपमध्ये राहण्यात आणि सत्तावीस वर्षांनंतर देखील त्याच पक्षाला विजयी करण्यामध्ये काही अर्थ नाही,’ असे सांगतानाच केजरीवाल यांनी ‘तुम्ही हुशार आहात. भाजपमध्ये थांबा पण काम मात्र आमच्यासाठी करा’ असे नमूद केले. मध्यंतरी ‘आप’चे सचिव मनोज सोराथिया यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला होता. आता राज्यामध्ये आपचे समर्थन करणाऱ्यांवर अशाप्रकारचे हल्ले होतच राहतील असेही ते म्हणाले. भाजपने आतापर्यंत काँग्रेसला शह दिला आहे पण आता त्यांच्यासमोर आप उभी आहे. आमचे आदर्श सरदार पटेल आणि भगतसिंग हे असल्याचे त्यांनी सांगितले.