दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना कोरोनानंतर डेंग्युची लागण; प्रकृती बिघडल्याने LNJP तून मॅक्समध्ये हलवलं

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

मनिष सिसोदिया यांना 14 सप्टेंबरला कोरोना झाला होता. त्यानंतर घरीच आयसोलेशनमध्ये होते. कोरोनाची लागण झाल्यानं 14 सप्टेंबरला दिल्ली विधानसभेच्या एक दिवसीय अधिवेशनात ते सहभागी होऊ शकले नव्हते. 

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग झालेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना डेंग्युची लागण झाल्याचंही समोर आलं आहे. चिंतेची बाब म्हणजे त्यांच्या पांढऱ्या पेशी कमी होत चालल्या आहेत. आता त्यांना लोक नायक जयप्रकाश रुग्णालयातून साकेत इथल्या मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. याशिवाय सिसोदिया यांना तापही आहे. याआधी त्यांना ताप आणि ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने लोक नायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल केलं होतं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुढच्या काही दिवसात पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येईल.

सिसोदिया यांची प्रकृती स्थिर असली तरी ताप अधिक असल्यानं आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु असून चिंतेचं कारण नाही.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सिसोदिया यांची प्रकृती सध्या ठीक आहे. गरज पडल्यास त्यांना ऑक्सिजन सपोर्ट दिला जाऊ शकतो असंही त्यांनी सांगितले. 

मनिष सिसोदिया यांना 14 सप्टेंबरला कोरोना झाला होता. ते घरीच आयसोलेशनमध्ये होते. कोरोनाची लागण झाल्यानं 14 सप्टेंबरला दिल्ली विधानसभेच्या एक दिवसीय अधिवेशनात ते सहभागी होऊ शकले नव्हते. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात कोरोनाची लागण झालेले सिसोदिया हे दुसरे मंत्री आहेत. याआधी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना जून महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. सत्येंद्र जैन यांना प्लाझ्मा थेरपी देण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi deputy cm manish sisodia admitted in icu he was tested covid positive