Manish Sisodia : सिसोदियांच्या अटकेनंतर दिल्लीमध्ये अलर्ट जारी; 'आप' देशभर करणार आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manish Sisodia

Manish Sisodia : सिसोदियांच्या अटकेनंतर दिल्लीमध्ये अलर्ट जारी; 'आप' देशभर करणार आंदोलन

नवी दिल्लीः दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी काल अटक करण्यात आली. सीबीआयने ही कारवाई केली आहे. त्यामुळे आज देशभर आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे.

दिल्लीमध्ये आपचे कार्यकर्ते भाजप मुख्यालयाबाहेर निदर्शने करणार आहेत. आपचे राष्ट्रीय महासचिव संदीप पाठक यांनी सांगितलं की, आम्ही सोमवारी देशव्यापी आंदोलन करणार आहोत. देशातल्या लाखो मुलांच्या भविष्यासाठी काम करणारे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांना एका खोट्या प्रकरणामध्ये अटक केली आहे.

आठ तासांच्या चौकशीनंतर सिसोदिया यांना काल रविवारी रात्री सीबीआयने अटक केली. त्यामुळे दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. विशेष पोलिस आयुक्तांनी दिल्लीच्या सुरक्षेसंबंधी बैठक बोलावली होती. पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याशिवाय आयुक्तांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांना रात्रभर पोलिस ठाण्यात थांबण्याचे आदेश दिलेले आहेत. दिल्लीत कुठेही आंदोलन किंवा धरणं करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. यासह लोकांना एका ठिकाणी जमा होण्यात मज्जाव करण्यात आलेला आहे.

मनीष सिसोदिया यांना अटक होईल, हे आम्हाला नेहमीच माहित होते. आपचे आमदार सौरभ भारद्वाज म्हणाले, "सीबीआय पूर्णपणे केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत आहे. मनीष सिसोदिया यांना अटक होणार हे आम्हाला आधीच माहीत होते. तसेच तपास यंत्रणा कशा प्रकारे काम करतात हे दुःखद आणि अंदाज करण्यासारखे आहे.

टॅग्स :aapdelhi news