दिल्लीत प्रेशर कुकरमध्ये स्फोटकं; ISIS च्या दहशतवाद्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

 नॅशनल सिक्युरीटी गार्डचे कमांडो सध्या परिसरात इतर काही स्फोटके आहेत का याचा तपास करत आहेत. प्रेशर कुकरमध्ये IED सापडले आहे.

दिल्ली - दिल्लीतील धौला कुआ रिंग रोडजवळ एका दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष पथकाने केलेल्या मोहिमेवेळी चकमकही झाली. यावेळी एकाला ताब्यात घेतलं असून त्याचा साथीदार पळून गेला. ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव अबू युसूफ असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्याकडून 2 आयईडी आणि शस्त्रे जप्त करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काल रात्री उशिरा शोध मोहिम सुरू केली होती. दहशतवादी मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेला ISIS दहशतवादी अबू युसूफ उत्तर प्रदेशातील बलरामपूर इथला आहे. एक पथक बलरामपूरमध्ये पोहोचलं आहे. अबू युसूफसोबत एकजण होता ते फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत. नॅशनल सिक्युरीटी गार्डचे कमांडो सध्या परिसरात इतर काही स्फोटके आहेत का याचा तपास करत आहेत. प्रेशर कुकरमध्ये IED सापडले असून त्याचे वजन किती आहे ते समजू शकलेले नाही. अधिक तपासानंतर माहिती समोर येईल असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी दिल्लीत मोठा हल्ला करण्याची तयारी करत होते. लोन वुल्फ अटॅक करण्याचा त्यांचा कट होता. अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी यासाठी पाहणीसुद्धा केली होती. दिल्लीतील काही लोक अबू युसूफला यामध्ये मदत करत होते त्यांना पकडण्यासाठी छापा टाकला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi isis terrorist ied found in pressure coocker delhi poilce investigation